दौंड (पुणे) : येथे राज्य राखीव पोलिस बलाच्या शिपाई भरतीसाठी लेखी परीक्षेला कॉपी केल्यामुळे तीन परीक्षार्थ्यांवर शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी प्रदीप आबासाहेब गदादे (रा. बेनवडी ता. कर्जत, जि. अहमदनगर) सुदर्शन उत्तमराव बोरूडे (रा. श्रीगोंदा जि. अहमदनगर) सतीश शिवाजी जाधव (रा. हिरडगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात दौंड येथील राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक ५ चे पोलिस नाईक नीलेश धुमाळ यांनी पोलिसांना फिर्याद दिली आहे. रविवार (दि २३) रोजी दौंड येथील तुकडोजी विद्यालयात राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक ५ साठी सशस्त्र पोलिस शिपाई भरतीची लेखी परीक्षा होती. यावेळी परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी संगनमताने पेपर कॉपी करून लिहीत असताना परीक्षा केंद्रावरील शिक्षक आणि राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक ५ चे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
तसेच परीक्षा केंद्रात लावलेल्या सीसीटीव्ही मध्येदेखील ही मुलं कॉपी करत असतानाचे चित्रण झाले आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. तुकडोजी विद्यालयात अठरा खोल्यांमध्ये ५०७ परीक्षार्थी परीक्षा देत होते.