भीमाशंकर : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे श्रावणी यात्रेनिमित्त बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची हुज्जत घालून धक्काबुक्की प्रकरणी दोघांवर घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिली.
घोडेगाव पोलिसांच्या वतीने पाच वाहनतळ सुरू करण्यात आले आहेत. भीमाशंकर वाहनतळ क्रमांक दोन येथे पोलीस नाईक तेजस इष्टे व इतर कर्मचारी बंदोबस्तावर असताना बाभूळगाव खालसा (ता. कर्जत, जि. अहमदनगर) येथील गाडी ( एम एच १६ बीझेड ००१४) या गाडीतून सुधीर सुनील झोडगे (वय - ३०) व तुषार भगवान नवले (वय - २९) यांनी सरकारी कामात अडथळा करत व पोलीस कर्मचारी यांच्याशी आरेरावीचे, उद्धटपणाचे वर्तन करत पोलीस कर्मचारी यांच्या डावा हात पिरगळून शिवीगाळ केली. अन् बाजूला ढकलून देऊन धक्काबुक्की करून तुझ्याकडे बघतोच अशी धमकी दिली.
तसेच चारचाकी वाहनाने बंदोबस्तासाठी ठेवण्यात आलेल्या बॅरिकेट्सला धडक देऊन दुसऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पायाला दुखापत केली असल्याची तक्रार पोलीस नाईक तेजस इष्टे यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात दिली. तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश डौले, पोलीस हवालदार दत्तात्रय जढर, अविनाश कालेकर, गणेश गवारी करत आहे.