पुणे : इलेक्ट्रिक दुचाकीच्या व्यवसायात भागीदार असलेल्या एका व्यक्तीची ३० लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हरियाणा येथील एका व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २७ जानेवारी २०२२ ते २९ जून २०२२ या कालावधीत शिवाजीनगर कोर्ट परिसरात घडला आहे.
याबाबत अभिरथ अंकुश शिंदे (२९, रा. कोकुळ हौसिंग सोसायटी, सुस पाषाण रोड, बाणेर) यांनी शुक्रवारी (दि. २८) शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून राहुल जोसेफ गोंन्साल्विस (३०, रा. बजगुंडा चौक, फरिदाबाद, हरियाणा) याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा इलेक्ट्रिक दुचाकीचा व्यवसाय आहे. ठाण्यासह पुण्यातील शिवाजीनगर येथील शाखेत ते भागीदार आहेत. फिर्यादी यांनी आरोपीसोबत ३० लाख रुपयांचा करार केला आहे. करार केल्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्याकडून ३० लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर राहुल गोंन्साल्विस याने कराराप्रमाणे वचन चिठ्ठी करुन दिली नाही. याबाबत फिर्यादी यांनी गोंन्साल्विस यांच्याकडे वारंवार विचारणा केली. मात्र, त्याने वचन चिठ्ठी करुन दिली नाही. त्यामुळे शिंदे यांनी दिलेले पैसे परत मागितले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन अभिरथ शिंदे यांची ३० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक डाबेराव करत आहेत.