पुणे : तुमच्या घराचे इंटेरिअरचे काम करून देतो, असे सांगत युवकाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी (दि. ३) वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत कौशल ललितकुमार चौहान (वय ३२, रा. हांडेवाडी रोड) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार हा प्रकार १ डिसेंबर ते १५ जानेवारी २०२४ दरम्यान घडला आहे. फिर्यादींना अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन आला. समाेरून कौशल चौहान बोलत आहे, असे सांगितले. तुमच्या घराचे इंटेरिअरचे काम करून देतो, असे सांगून वेगवेगळ्या लिंक पाठवल्या. त्यामध्ये इंटेरिअर कामाचे काही व्हिडीओज होते. त्यामुळे तक्रारदार यांना आरोपीवर विश्वास बसला.
इंटेरिअरचे काम करण्यासाठी पैसे पाठवा असे सांगून फिर्यादींना ५ लाख ३ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. पैसे देऊनही कामाला सुरुवात झाली नाही म्हणून फिर्यादींनी विचारणा केली असता त्यांना आणखी पैसे भरण्यासाठी तगादा लावला. फिर्यादींनी पैसे देण्याचे बंद केले म्हणून आरोपीने त्यांचे फोन घ्यायचे बंद केल्यावर आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादींच्या लक्षात आले. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक पतंगे करत आहेत.