पुणे : खूनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या आरोपीला मुंढवा पोलिसांनी अटक केली. मागील दोन महिन्यांपासून आरोपी ओळख लपवून राहत होता. अनुप ढगे (२३, रा. केशवनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ढगे याने दोन महिन्यांपूर्वी मुंढवा परिसरात एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी त्याच्यावर आर्म अॅक्टसह जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून तो पसार झाला होता.
आरोपीचा शोध घेत असतानाच संबंधित गुन्ह्यातील आरोपी हा उरुळीकांचन भागात येणार असल्याची माहिती मुंढवा पोलिस ठाण्याचे अंमलदार महेश पाठक यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून ढगेला उरूळीकांचन येथील पीएमपीएल बसथांब्यावरून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. सहायक पोलिस आयुक्त आश्विनी राख, मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेश बोळकोटगी, गुन्हे निरीक्षक संगिता रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप जोरे, अंमलदार महेश पाठक, दिनेश राणे, संतोष काळे, संतोष जगताप यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.