बारामती (पुणे) : ८० तोळे सोने घेऊन त्या बदल्यात फक्त वीस लाख रुपये देऊन उर्वरित सोन्याचा अपहार करुन एका महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी बारामतीतील सहा जणांविरुद्ध शहर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणांमध्ये दोन पोलीस कर्मचारी, सराफ व त्याचा मुलगा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच यामध्ये एका पोलीसासह सराफाविरोधात बलात्कारप्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी शिवाजी राजाराम निकम, भरत ओसवाल, कविता शिवाजी निकम, जीत ओसवाल, श्रीकांत राजाराम निकम, समीर शेख व दोन अनोळखी इसम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामधील शिवाजी निकम हे वालचंदनगर पोलीस ठाण्यात तर श्रीकांत निकम हे अकलूज पोलीस ठाण्यात सध्या कार्यरत आहेत.यामध्ये शिवाजी निकम, भरत ओसवाल यांच्याविरुद्ध बलात्काराचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर इतर सर्वांविरुद्ध फसवणूक व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित महिलेकडून ८० तोळे सोने घेऊन त्या बदल्यात फक्त वीस लाख रुपये देऊन उर्वरित सोन्याचा अपहर करून फियार्दीची फसवणूक केली. तसेच सोने परत देतो म्हणून शक्ती प्लाझा खाटीक गल्ली बारामती येथे बोलावून तिच्यावर बलात्कार केला. जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केली. तसेच कविता शिवाजी निकम, जीत ओसवाल, श्रीकांत राजाराम निकम व समीर शेख यांनी फियार्दीस गरुड बाग येथे बोलावून जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास उपविभाग उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश करीत आहेत. हा प्रकार उघड झाल्यानंतर बारामतीत खळबळ उडाली आहे.