पुणे : यूट्यूबचे एजंट असल्याचे भासवून ज्येष्ठाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी (दि. ३) फरीदा, लैला आणि अलेक्झांडर यांच्यावर चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, समीर सुधाकर शहाणे (वय ५४, रा. शिवाजीनगर) यांनी पोलिसांना फिर्याद दिली आहे. त्यानुसार हा प्रकार २४ मार्च २०२३ ते ३ एप्रिल २०२४ यादरम्यान घडला आहे. अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन करून फरीदा, लैला आणि अलेक्झांडर अशी नावे सांगून यूट्यूब मार्केटिंग एजन्सीमधून बोलत असल्याचे सांगितले. तुम्हाला पार्ट टाइम जॉब करायचा आहे का, अशी विचारणा केली.
फिर्यादींनी होकार दिल्यावर त्यांना वेगवेगळी कामे करण्यास सांगितले मात्र नफा दिला नाही. त्यानंतर तक्रारदार यांना एकूण ११ लाख ९२ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यावर पाठवण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक नांद्रे करत आहेत.