पुणे : गणेशाेत्सवाकरीता मंडपासाठी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली आहे.
गणेशाेत्सवाच्या तयारीसाठी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महापालिकेने गणेश मंडळांची बैठक घेतली हाेती. यावेळी गणेश मंडळांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी केलेल्या मागण्या प्रशासनाकडून मान्य केल्या गेल्या आहेत. पुढील आठवड्यात गणेशाचे आगमन हाेत आहे. बहुतेक गणेश मंडळांचे मंडप उभारणी पुर्ण झाली असुन, रनिंग मंडप आणि कमानी देखील उभ्या राहुन, त्यावर जाहीरातील झळकू लागल्या आहेत. काेराेनाच्या दाेन वर्षाच्या निर्बंधामुळे गणेशाेत्सव साजारा हाेऊ शकला नाही, तसेच राज्य सरकारनेही कार्यकर्त्यांना प्राेत्साहित करणारी भुमिका घेतली आहे.
यापार्श्वभुमीवर गणेश मंडपाच्या आकारासंदर्भात उच्च न्यायालयाचे आदेश असून, या आदेशानुसारच मंडप उभारणी करावी लागणार आहे. या मंडपासंदर्भातील अहवाल हा उच्च न्यायालयास सादर करावा लागणार आहे. यामुळे गणेश मंडळांनी नियमानुसारच मंडपाचा आकार ठेवावा, जी गणेश मंडळाने त्याचे पालन करणार नाहीत, त्यांच्याविरुद्ध गुन्हा नाेंदविण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त जगताप यांनी सांगितले.
गणेश मुर्ती विक्रीसाठी परवानगी देणार
गणेश मुर्ती विक्रीचे स्टाॅल शहरात माेठ्या प्रमाणावर उभे राहिले आहेत. संबंधित विक्रेत्यांनी महापालिकेकडून रितसर परवानगी घ्यावी अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल असेही जगताप यांनी नमूद केले आहे. तसेच महापालिकेकडून मुर्तीकार, उत्पादक आदींना एकत्रितपणे मुर्ती विक्रीचे स्टाॅल उभे करण्यास परवानगी दिली जाणार आहे. त्यानुसार शिवाजी पुलाजवळील गाडगीळ पुतळा ते डेंगळे पुलाच्या दाेन्ही बाजुला सुमारे दिडशे स्टाॅल उभे करण्यास परवानगी दिली जाईल. मागणी वाढल्यास श्रमिक भवन येथील रस्त्यावर देखील स्टाॅल उभे करण्यास परवानगी दिली जाणार आहे. दरम्यान गणेशाेत्सवाच्या कालावधीत रस्त्यावर अनधिकृतपणे स्टाॅल, पथारी आदींचे अतिक्रमण माेठ्या प्रमाणावर हाेते. यावर कारवाई करण्यासाठी फिरती पथके तैनात केली जाणार आहेत.