पुणे : हनुमान टेकडीवर वॉकला गेलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्याला धमकावून त्याच्या गळ्यातील ३५ हजार रुपयांची सोनसाखळी चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत सुमित युवराज तभाने (२१, रा. सीओईपी बॉईज हॉस्टेल, शिवाजीनगर) या तरुणाने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार तरुण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असून, तो रविवारी (दि. २४) दुपारी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या हनुमान टेकडीवर फिरायला गेला होता. सायंकाळी पावणेचारच्या सुमारास टेकडीवर दोन चोरट्यांनी तरुणाला धमकावले. त्याला मारण्याची धमकी देऊन चोरट्यांनी त्याच्या गळ्यातील ३५ हजारांची सोनसाखळी चोरून नेली. घाबरलेल्या तरुणाने डेक्कन पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पसार झालेल्या चोरट्यांचा पोलिसांकडून माग काढण्यात येत असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेश भोसले करत आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये टेकड्यांवरील लूटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बोपदेव घाटात घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकारानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी टेकडीवर गस्त घालण्याचे आदेश दिले होते. टेकड्यांच्या परिसरात प्रखर दिवे बसवण्याच्या सूचना दिल्या होत्या. शहरातील वेताळ टेकडी, हनुमान टेकडी, वारजे, तसेच पाषाण-बाणेर रस्त्यावरील टेकडीवर नागरिक मोठ्या संख्येने फिरायला जातात. तरीदेखील भरदुपारी असे प्रकार होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.