पुणे : लिंगाळी ( ता. दौड) येथे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालून एका कुटुंबातील नवरा-बायकोला बेदम मारहाण करून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. रात्री अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. या घटनेत चोरट्यांनी अविनाश वत्रे आणि त्यांची पत्नी कोमल यांना मारहाण केली आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास वत्रे यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात शिरकाव केला. यावेळी वत्रे दाम्पत्याला लाकडी दांडक्याने मारहाण करीत त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर चोरट्यांनी या कुटुंबाला तोंडावर पांघरूण घेऊन झोपायला लावले. यावेळी चोरट्यांनी घरातील कपाट उघडून कपाटातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि लहान मुलाच्या कानातील डुल काढले. वत्रे दाम्पत्याने तोंडावरील दागिने काढल्या नंतर त्यांना परत मारहाण केली. दरम्यान, वत्रे दाम्पत्य आणि त्यांचा लहान मुलगा यांना घरात कोंडून चोरट्यांनी पोबारा केला. त्यानंतर अविनाश वत्रे यांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील लोक त्यांच्या मदतीला आले तसेच घटनेची माहिती पोलिसांना समजल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
आई-वडिलांना मारहाण झाली असती
अविनाश हे वडिलांना घेऊन आळंदी येथे रुग्णालयात गेले होते. वडिलांना रुग्णालयात दाखल करून रात्री ते घरी परतले होते. त्यांचे आई-वडील आणि बहीण रुग्णालयात थांबले असल्यामुळे ते घरी नव्हते अन्यथा त्यांच्या आई-वडील आणि बहिणीला चोरट्यांनी मारहाण केली असती.
क्रूरतेचा कळस
अविनाश यांत्या रियांश या लहान मुलाच्या कानात सोन्याच्या बाळ्या होत्या. चोरटे या मुलाच्या कानातून बाळ्या काढायला लागले. तेव्हा बाळाचे आई-वडील म्हणाले, आम्ही त्याच्या कानातील बाळ्या काढून देतो पण मारू नका. लहान मुलाच्या कानातील बाळ्या निघत नसल्याने निर्दयी चोरट्यांनी नख कापण्याच्या नेलकटरने त्याच्या दोन्ही कानातील बाळ्या काढून घेतल्या.