पुणे : हा एक वेगळाच पदार्थ आहे. इराण्याच्या हॉटेलमध्ये जाणाऱ्यांना आठवत असेल. आता नव्याने पुन्हा इराणी हॉटेल्स सुरू होत आहेत. त्यात हा समोसा मिळतो. अगदी पूर्वी होता तसाच मिळतो हा आनंदच आहे. नेहमीचा बटाट्याची भाजी भरलेला सामोसा व हा सामोसा यात फक्त आकाराचेच काय ते साम्य. बाकी चवीढवीला हा एकदम वेगळाच. एकदम कडक.
मैद्याची पट्टी
बरेचसे कडक आवरण हेच त्याचे वैशिष्ट्य. मैद्याची पातळशी पट्टी असल्याने एकदा तळली तरी हा सामोसा कडक होतो. मात्र कडक असल्यामुळे हे सामोसा वारंवार तळले जातात असा एक गैरसमज आहे. मैद्याचे पीठ तेलात मळून घेतले जाते. त्याच्या मोठ्या पुऱ्या केल्या जातात. त्या पीठ टाकून एकावर एक ठेवून अगदी थोड्या भाजल्या जातात. तेलाचा वापर एकदम मर्यादित. अशा भाजल्या की त्या थोड्या कडक होतात. मग त्याची पट्टी करून घ्यायची. आधी भाजल्यामुळेच त्यानंतर तळल्या की बहुधा कडक होत असाव्यात.
कोबीच्या भाजीचे सारण
सामोशाच्या आतील भाजी म्हणजे शब्दश: कोबीची कांदा घालून केलेली भाजी. कधी त्यात मटारही असते. करणारा फारच खवय्या असेल तर मग आले, लसूण वगैरेही मिळतात. बटाट्याचे बारीक कापही काहीजण टाकतात. हा मसाला तुम्हाला आवडेल तसा, हवा त्याप्रमाणे तयार करा. हवे असेल तर त्यात पनीरचे तुकडेही टाकता येतात.
असा बनवतात पट्टी सामोसा
पट्टीचा त्रिकोण करून त्यात हे सारण भरायचे. मैद्याचीच पेस्ट तयार करून त्या पेस्टने प्रत्येक त्रिकोण चिकटवायचा. हे थोडे कौशल्याचे काम आहे. कढईतील गरम तेलात सामोसा कितीही खालीवर झाला तरी तो फुटला नाही पाहिजे अशा पद्धतीनेच हे तिन्ही कोन चिकटवायला लागतात.
स्मरणरंजन
जुन्या इराणी हॉटेलमध्ये जाऊन सामोसा मागितला की लगेच ६ सामोसे असलेली डीश समोर येत असे. कॅम्पातील नाझ अनेकांना आठवत असेल. डिशमधील सर्वच सामोसे तुम्ही खायला हवेत असे बंधन नसायचे; पण माहिती नसल्याने अनेकजण सगळेच सामोसे खायचे. जेवढे खाल्ले तेवढ्याच सामोशांचे बिल लागायचे. सॉसबरोबर हा पट्टी सामोसा झकास लागतो. त्याबरोबर चहाचा एक घोट घ्यायचा. चहाही अर्थात इराण्याचाच हवा. आपल्या अमृततूल्य चहाबरोबर काही हा सामोसा गोड (चवीच्या नाही तर आवडीच्या अर्थाने) लागत नाही.
कुठे? कॅफे गुडलक किंवा कोणतेही इराणी हॉटेल.
कधी? सकाळीच जायला हवे, दुपारी संपतात व संध्याकाळी पुन्हा सुरू होतात.