पुणे : कमी पैशांमध्ये प्रवासासाठी देशभरात रेल्वेचा पर्याय निवडून असंख्य प्रवासी दररोज प्रवास करतात. पण, रेल्वेमध्ये विमान प्रवासाप्रमाणेच फक्त चहासाठी अधिक पैसे मोजावे लागत असतील तर सर्वसामान्यांनी काय करायचे, असा सवाल उपस्थित होत आहे. शताब्दी, राजधानी आणि दुरांतो या एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना एक कप चहासाठी ७० रुपये मोजावे लागत आहेत.
शताब्दी, राजधानी आणि दुरांतो सारख्या रेल्वेमध्ये तिकिटातच चहा, नाष्टा, जेवण आणि पाणी बॉटलचे पैसे आकारलेले असतात. त्याव्यतिरिक्त जर एखाद्या प्रवाशाला चहा प्यायचा असेल तर त्याला ७० रुपये मोजावे लागतात. २० रुपयांचा चहा आणि ५० रुपयांचा सर्व्हिस चार्च आयआरसीटीसीकडून आकारला जात असल्याने चहासाठीच एवढे पैसे मोजावे लागत असतील तर खाण्याच्या नादी लागूच नये असा विचार प्रवासी करत आहेत.
२३ मे २०१८ रोजी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने काढलेल्या एका अध्यादेशात ज्या प्रवाशांनी प्रवासाआधी तिकीटामध्ये खानपानासाठी पैसे दिलेले नसतील आणि प्रवासादरम्यान जर त्यांना काही पाहिजे असेल तर त्यावर ५० रुपये सर्व्हिस चार्ज लागेल असे म्हटले आहे. या निर्णयामुळे प्रवाशांचे नाहक पैसे वाया जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच भविष्यात प्रवासी अधिकृत लोकांकडून खानपान घेण्याऐवजी रेल्वे स्थानकांवर अथवा रेल्वेत फिरत असलेल्या अनधिकृत विक्रेत्यांकडून घेण्यास सुरुवात करतील यात शंका नाही.
नागरिकांनी बिल घेणे गरजेचे..
रेल्वे प्रशासनाच्याच म्हणण्याप्रमाणे प्रत्येक प्रवाशाने खानपानाचे बिल घेणे गरजेचे आहे. त्यात अशा पद्धतीने नागरिकांची लूट होत असेल तर त्यांनी देखील बिल मागणे गरजेचे आहे.
ही प्रवाशांची लूट..
अशाप्रकारे २० रुपयांच्या चहासाठी ५० रुपये सर्व्हिस चार्ज आकारणे योग्य असू शकत नाही. आज याला विरोध केला नाही तर भविष्यात देशातील १५ हजार रेल्वेमध्ये याच पद्धतीचा अवलंब केला जाऊ शकतो. एकप्रकारे प्रवाशांवर रेल्वे अन्याय करत आहे. जीएसटीपेक्षा अधिक कर सर्व्हिस चार्जद्वारे लावला जात आहे. हा प्रकार तत्काळ थांबला पाहिजे रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी सांगितले.