पांडुरंग मरगजे
धनकवडी : सायकलपटू महेश गोगावले यांनी पुणे येथून निघून सायकलने सुमारे २५०० किलोमीटर अंतर अनेक अडचणींचा सामना करत केवळ २२ दिवसात गाठले आहे. विजया दशमीच्या दिवशी केदारनाथचे दर्शन घेत त्यावर जलाभिषेक केला. यावेळी 'झाले जन्माचे सार्थक' अशी ज्वलंत अनुभूती त्यांनी पुण्यात परतल्यावर लोकमत कडे व्यक्त केली.
महेश गोगावले यांनी केलेल्या केदारनाथ ज्योतिर्लिंगाच्या यशस्वी सायकल सफरीबद्दल चिंतामणी ज्ञानपीठचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब रेणुसे यांनी पुण्यात येताच अभिनंदन केले. तर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट, सामाजिक कार्यकर्ते युवराज रेणुसे, सत्या फौंडेशन चा गीतांजली जाधव यांच्या हस्ते महेश गोगावले यांचा सत्कार करण्यात आला.
धनकवडी, मोहननगर (मुळगाव पुणे जिल्ह्यातील शिंदेवाडी) येथील सायकलपटू महेश गोगावले हा तरूण सप्टेंबरच्या मध्यात पुण्यातून सायकलवर स्वार झाला आणि केदारनाथच्या दिशेने निघाला. प्रवासामध्ये तिनही ऋतूंच्या संमिश्र वातावरणाचा अनुभव घेत प्रति दिवस सरासरी शंभर ते एकशे पंच्याहत्तर किलोमीटर सायकलने प्रवास केला. महेश गोगावले यांनी दिल्ली येथे पालघर चे खासदार राजेंद्र गावित यांच्या निवासस्थानी मुक्काम केला. मेरठ मुजफ्फराबाद, वैष्णोदेवी वाघा बॉर्डर, उज्जैन, शिवपुरी अशी मजल दरमजल करत महेश ने केवळ एक वेगळा अनुभव घेण्यासाठी कोणतंही ठोस नियोजन न करता केदारनाथ सायकल सफर पुर्ण केली.
'सायकल चालवा, प्रदुषण टाळा...
माझ्या सायकल सफरीमध्ये मी 'सायकल चालवा, प्रदुषण टाळा, व्यसनांपासून मुक्त रहा, पाणी वाचवा, स्वच्छता राखा' हा संदेश गावोगाव मध्ये दिला आणि त्यास नागरिकांचा उत्तम प्रति साद लाभला. नागरिकांनी दररोज किमान पाच किलो मीटर सायकल चालवल्यास त्यांना उत्तम आरोग्य लाभेल. - महेश गोगावले, सायकल पटू