वरातीप्रमाणे सजवलेली जीप! उभं राहणंही कठीण, माजी मुख्यमंत्री विलासरावांच्या आठवणीतली रॅली
By राजू इनामदार | Published: November 11, 2024 03:05 PM2024-11-11T15:05:04+5:302024-11-11T15:06:42+5:30
रॅली सुरू झाल्यावर या सजवलेल्या जीपमध्ये शब्दश: उभे रहायलाही जागा नव्हती, नंतर नंतर तर जीप तिरकी व्हायला लागली अन् विलासराव घाबरले
पुणे: निवडणुकीतील रॅली म्हणजे भलातच गमतीचा प्रकार असतो. छायाचित्रात दिसते आहे ती अशीच एक रॅली आहे. युवक काँग्रेसच्या ही रॅली १९७६ मधील आहे. रॅली आहे अंबाजोगाईतील. पुढे राज्याचे मुख्यमंत्री झालेले विलासराव देशमुख त्यात दिसत आहेत. त्यावेळी ते होते उस्मानाबाद युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. युवक काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष व पुढे विधानपरिषदेचे आमदार झालेले उल्हास पवार हेही रॅलीमध्ये आहेत. ते प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे त्यांच्याच नेतृत्वात ही रॅली निघाली होती.
त्याशिवाय तत्कालीन युवक काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारीही दिसत आहेत. त्यात ती पदयात्रा, प्रचारफेरी असेल तर वेगळी गोष्ट. जीपमधून वगैरे मिरवणूक असेल तर कार्यकर्त्यांना आवरणे मुश्किल असते. अंबाजोगाईतील निवडणुकीत निघालेल्या या रॅलीत जीपला सजवलेले होते. जणू एखाद्या विवाहाची वरातच. उल्हास पवार यांनी सांगितले की कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह होता. त्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या प्रचाराच्या या रॅलीत संपूर्ण जीप सजवली होती. त्यामुळे त्या जीपमध्ये बसायला सुरूवातीला विलासराव नकोच म्हणत होते. मात्र कार्यकर्त्यांचा आग्रह होता. बसायचे नाहीच, उभे रहायचे आहे असे कार्यकर्ते सांगत होते.
त्यामुळे अखेर विलासरावांनी त्याला मान्यता दिली. मी अध्यक्ष असल्यामुळे मलाही त्यांच्याबरोबर जीपमध्ये उभे रहावे लागले. खरी मजा रॅली सुरू झाल्यावर आली. जीपमध्ये बसायला जागा नाही असे आपण म्हणतो, पण रॅली सुरू झाल्यावर त्या जीपमध्ये शब्दश: उभे रहायलाही जागा नव्हती. नंतर नंतर तर जीप तिरकी व्हायला लागली. विलासराव व मी, दोघेही घाबरलो. खाली उतरू म्हणू लागलो. मात्र कार्यकर्ते ऐकतच नव्हते. सलग तीनतास ती रॅली अंबाजोगाईतून गल्लीबोळात फिरत होती. चालून दुखले नसतील इतके पाय या रॅलीमध्ये उभे राहून दुखले असे उल्हास पवार सांगतात.