पुणे : दिवाळीनिमित्त घराची साफसफाई करण्यासाठी ‘अर्बन कंपनी’ या ॲप्लिकेशनवरून बोलावलेल्या पाचपैकी दोघांनी बांधकाम व्यावसायिकाच्या घरातून हिऱ्याची अंगठी चोरली. याबाबतचा गुन्हा हडपसर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
हडपसरमधील अमेनारामध्ये १२ ऑक्टोबरला हा प्रकार घडला. या प्रकरणी मनोज चव्हाण व युवराज शेलार (दोघेही रा. हडपसर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत युवराज बाळासाहेब घावटे (वय ३४, रा.एम्पायर टायर, अमेनारा, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अधिक माहितीनुसार, दिवाळीनिमित्त सदनिकेची साफसफाई करायची ऑर्डर फिर्यादी यांनी अर्बन कंपनीला दिली होती. घटनेच्या दिवशी अर्बन कंपनीचे एकूण पाच कर्मचारी फिर्यादी यांच्या घरी आले. त्यापैकी मनोज चव्हाण व युवराज शेलार या दोघांनी फिर्यादी झोपत असताना, त्यांच्या बेडरूमची स्वच्छता केली. बाकीचे तीन कर्मचारी उर्वरित घराची साफसफाई करीत होते. साफसफाई करून सर्व जण संध्याकाळी घरातून निघून गेले. ते गेल्यानंतर फिर्यादी यांनी घराची पाहणी केली असता, त्यांना बेडरूममधील कॉम्प्युटर टेबलवर ठेवलेली दोन लाख रुपये किमतीची हिरेजडीत सोन्याची अंगठी आढळून आली नाही. ती अंगठी अर्बन कंपनीचे कामगार मनोज चव्हाण व युवराज शेलार यांनी चोरल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
ॲप्लिकेशनचे वापरकर्ते मोठ्या विश्वासाने त्यांचे काम करून घेण्यासाठी ऑर्डर देतात. कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांची नोंदणी व तपासणी न करताच त्यांना कोणाच्या घरी पाठविले, तर भविष्यात आणखी गुन्हे होऊ शकतात. या सर्वांबाबत जबाबदारी निश्चित करावी. चुकीचे काही घडल्यास कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी.
- ॲड.प्रतीक राजोपाध्ये आणि ॲड.आशिष पाटणकर, फिर्यादी यांचे वकील.