पुण्यातील बिल्डर अग्रवालच्या बाळाने पोर्शे कारने दोघांना चिरडले आणि पोलिसांसह आमदाराकडून त्याला वाचविण्याचे प्रयत्न यामुळे पुण्यातील जनमानसातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागली होती. यावरून वातावरण तापतेय हे पाहून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लक्ष घालत कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली. या प्रकरणात बिल्डर विशाल अग्रवालला अटक झाली असून मुलालाही बाल सुधार गृहात पाठविण्यात आले आहे. तसेच पोलिसांनी आता या अग्रवाल कुटुंबाविरोधात कोणाच्या तक्रारी असतील तर त्या नोंदविण्याचे आवाहन केले आहे.
अशातच या प्रकरणाच्या सुनावणीशी संबंधीत प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी लोकभावनेवर प्रतिक्रिया दिली आहे. पुणे अपघात प्रकरण सर्व पुणेकरांसाठीच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वच लोकांसाठी महत्त्वाची केस ठरत आहे. ज्या प्रकारे एका अल्पवयीन मुलाने अपघात केलेला आहे आणि यात दोन निष्पाप लोकांचे जीव गेले आहेत त्यामुळे ही घटना अत्यंत विदारक अशा स्वरुपाची आहे, असे सरोदे म्हणाले.
एकीकडे हा भावनिक मुद्दा म्हणून पाहू शकतो, की ही केस कोणत्याही संवेदनशील माणसाला पटणार नाही असे हे लोक वागतात. श्रीमंतासाठी वेगळा न्याय देण्यात येतो, त्याचा राग येणे सहाजिकच आहे. पोलिसांनी आज मागणी केली की आरोपींना अजून पोलिस कोठडी द्या चौकशी करायची आहे. त्यामुळे ७ तारीखपर्यंत कोठडी दिली आहे, असे सरोदे यांनी स्पष्ट केले.
काल काय घडले...येरवडा पोलिसांकडून निष्काळजीपणा झाल्याची कबुली स्वत: पोलिस आयुक्तांनीच दिली. अपघातानंतर अग्रवाल कुटुंबीयांकडून बाळाच्या ऐवजी ड्रायव्हरच पोर्शे कार चालवत असल्याचा बनाव केला गेला, मात्र ते बाळच गाडी चालवत असल्याचे भक्कम पुरावे आमच्याकडे आहेत, असे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलिस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी अशी निलंबित करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. अपघात झाला त्या रात्री हे दोघे त्या ठिकाणी ड्यूटीवर तैनात होते. अपघात झाल्यानंतर त्यांनी कंट्रोल रूमशी संपर्क केला नाही, तसेच नाईट राऊंडवर असलेल्या पोलिस उपायुक्तांनाही याची माहिती दिली नाही. त्यांनी ही माहिती का लपवून ठेवली, त्यांचा हेतू नेमका काय होता, याचीही चौकशी करण्यात येणार आहे.