नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी : विधवा आईचे दिल्लीतील घर विकून ते पैसे डॉक्टर मुलीने आणि जावयाने लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईला विविध कारणे सांगत तिच्याकडून २ कोटी ५८ लाख ८२ हजार रुपये घेत तिची आर्थिक फसवणूक केली. पिंपळे सौदागर येथे १ जानेवारी २०१२ ते १ जून २०२४ या कालावधीत ही घटना घडली.
याप्रकरणी पिंपळे सौदागर येथील ८१ वर्षीय वृद्ध महिलेने रविवारी (२ मार्च) काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार फिर्यादी वृद्धेच्या रहाटणी येथील सनशाइननगर येथे राहणारी मुलगी (वय ५०) व जावई (वय ५५) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. काळेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे आई-वडील दिल्लीत राहत होते. संशयित मुलगी होमिओपॅथी डॉक्टर असून जावई बँकेत नोकरीला आहे. फिर्यादी महिलेला मुलगाही आहे. मात्र, वडिलांचे निधन झाल्यानंतर मुलगी आणि जावयाने आईला विश्वासात घेऊन वाकड येथे राहण्यास भाग पाडले. त्यासाठी फिर्यादी आईचे दिल्लीतील घर दोन कोटी १० लाख रुपयांना विकायला लावले. आलेल्या पैशांपैकी ९० लाख रुपये आईच्या बँक खात्यात जमा केले. तर, उर्वरीत एक कोटी २० लाख रुपये मुलीने स्वत:कडे ठेवले. सप्टेंबर २०१२ मध्ये मुलीने आईला रहाटणी येथे दीड कोटी रुपयांमध्ये नवीन घर घेण्यासाठी राजी करून त्यासाठी तिने दिल्लीच्या घर विक्रीतून उरलेले एक कोटी २० लाख रुपये आणि आईकडून पुन्हा ४० लाख रूपये घेतले. मुलगी आणि जावयाने कट रचून त्या घरावर आईची कसलीही संमती नसताना स्वत:चे नाव को-ओनर म्हणून नोंदवत फसवणूक केली.
मुलीने क्लिनिक खरेदीकरिता आईला ‘४० लाख रुपये दे मी तुला त्यात हिस्सा देते’ असे सांगून पैसे घेतले. त्याच पैशातून रहाटणी येथे दुकान विकत घेतले. त्या दुकानात आईने स्वत:चे पैसे गुंतविले असताना तिला कोणताही हिस्सा न देता तसेच तिचे पैसे परत न करता फसवणूक केली. १० डिसेंबर २०१२ रोजी मुलगी आणि जावयाने बन्सल प्लाझा येथील दुकान खरेदीसाठी नेऊन ते तुझ्या नावावर करुन देऊ, असे सांगून १८ लाख ८२ हजार रूपये धनादेशाव्दारे आणि ४० लाख रुपये रोख असे ५८ लाख ८२ हजार रुपयाला दुकान खरेदी केले. परंतु, ते दुकानही आईच्या नावावर न करता तिच्याकडून त्या दुकानाची पूर्ण किंमत घेतली आणि फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्या दुकानात ५० टक्के हिश्श्याने स्वत:चे नाव नोंदवून आईची दोन कोटी ५८ लाख ८२ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. वडिलांचे पासबुक, चेक बुक, पॅनकार्ड, अन्य कागदपत्रे मागितली असता मुलीने आईला मारहाण केली. तसेच, बनावट स्वाक्षरी करून आई-वडिलांच्या संपत्तीची बेकायदेशीररित्या विक्री करून फसवणूक केली. आईने मुलगी आणि जावयाविरोधात न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.