पुणे : नऱ्हे भागात दारूच्या नशेत एका तरुणाने सात दुचाकी पेटविल्या हाेत्या. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी बबलू इस्लाम अन्सारी (१९, रा.अश्विनी अपार्टमेंटच्या मागे, चव्हाण चाळ, नऱ्हे) याला अटक केली आहे. याबाबत ओंकार महेश धानेपकर (२४, रा.अश्विनी अपार्टमेंटजवळ, नऱ्हे) याने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी बबलू कामधंदा करत नाही. त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे. अश्विनी अपार्टमेंटच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेत परिसरातील रहिवासी वाहने लावतात. या दुचाकी मंगळवारी (दि. ४) मध्यरात्री बबलूने पेटवून दिल्या. या घटनेत दोन दुचाकी पूर्णपणे जळल्या, तर पाच दुचाकींना झळ पोहोचली. या घटनेची माहिती मिळताच, सिंहगड रस्ता ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तपासात आरोपी बबलू अन्सारीने दुचाकी पेटवून दिल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. उपनिरीक्षक अस्मिता लाड तपास करत आहेत.