पुणे: विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ पक्षाने महायुतीलामतदान करण्यावर टाकलेला बहिष्कार मागे घेतला तरी त्यांच्यातीलच एका गटाने मात्र आपला बहिष्कार अजूनही कायम ठेवला आहे. पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आवाहनानंतरही पुण्यातील माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे व त्यांच्या सहकारी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सोमवारी मेळावा घेऊन बहिष्कार कायम ठेवण्याची भूमिका जाहीर केली.
डॉ. धेंडे यांनी यासाठी पुढाकार घेतला. ते म्हणाले, राजकारणात सन्मानपूर्वक वागणूक न देणाऱ्या महायुतीलामतदान न करण्याची आमची भूमिका कायम आहे. आमचे मत निळा झेंडा, आंबेडकरी विचारांना व स्वाभिमानाला आहे. पुणे स्टेशनजवळच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात यासंबधीचा मेळावा झाला. ॲड. आय्युब शेख, आरपीआयच्या पुणे महापालिकेच्या माजी गटनेत्या फरजाना शेख, मौलाना कारी मोबशीर अहमद, हनुमंत गायकवाड, तानाजी गायकवाड, ईश्वर ओव्हाळ, विशाल बोर्डे, विजय कांबळे, गजानन जागडे , रविंद्र चाबुकस्वार , यांच्यासह आरपीआयचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. धेंडे यांच्यासह अयूब शेख, मौलाना कारी यांचीही भाषणे झाली. निवडणुकीच्या काळात आंबेडकरी जनतेला विविध आश्वासन देत त्यांचे मतदान पदरात पाडून घेण्याची भाजपची भूमिका आता आंबेडकरी जनता ओळखून आहे. त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत आंबेडकरी जनता महायुतीच्या एकाही उमेदवाराला मतदान करणार नाही असे त्यांनी सांगितले. तशा आशयाची प्रतिज्ञा मेळाव्यात सर्व उपस्थितांनी समूहस्वरात घेतली.
महायुतीने दिलेल्या अपमानास्पद वागणूकीचा निषेध म्हणून याआधीच मी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आंबेडकर विचारांच्या प्रत्येकाने आता महायुतीला मतदान करायचे नाही असे निर्धार करावा. अपमान सहन करून राजकारणात राहणे शक्य नाही, तो डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा अपमान ठरेल. त्यामुळेच आम्ही असा निर्धार केला आहे. डॉ. सिद्धार्थ धेंडे- माजी उमहापौर