पिंपरी : काही दिवसांपूर्वी राज्यातील कंपन्या गुजरातला पळविल्या. त्यानंतर, आम्ही सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, केंद्राने सांगितले आहे की, दुसरी कंपनी देऊ. आता देव चोरत आहेत. भीमाशंकर देवस्थानावर आसाम सरकार दावा करत आहे. उद्या विठ्ठल चोरतील, त्याबद्दल भाजपच्या मंडळीना विचारले, तर ते बोलतील. आम्ही तुम्हाला तिरुपती देऊ. त्यामुळे अशा खोट्या आणि फसव्या सरकारवर विश्वास ठेवता येणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली.
महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ रहाटणी येथे सोमवारी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेता तथा आमदार भास्कर जाधव, निवडणूक प्रभारी तथा आमदार सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे, युवानेते रोहित पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव सुभान अली, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजित गव्हाणे आदी उपस्थित होते.
यावेळी धनंजय मुंडे म्हणाले, या देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. सिंहासनासाठी सुरतेला लोटांगण घातले जाते आहे. राज्यातील सरकारमुळे मराठीतील अशीही बनवाबनवी आणि पळवापळवी चित्रपट सारखे आठवतात. बनवाबनवी करून सरकार आणले आणि उद्योगांची पळवापळवी सुरू केली. उद्योग ठिक होते, पण आता देवही पळवायला लागले. नऊ वर्षे सत्ता असताना हिंदू धोक्यात असल्याचे सांगून मोर्चे काढले जात आहेत, असे असेल, तर पंतप्रधानांनी नऊ वर्षे काय केले, हा प्रश्न असल्याचे मुंडे म्हणाले.