उदापूर : फायनान्सवाले दमदाटी करतात व पतसंस्थेवाले अपशब्द वापरतात. त्यात शेतीमालाला रास्त बाजारभाव मिळत नाही, याला केंद्र व राज्य सरकार जबाबदार आहेत. मोदींचा शेतीवर कंट्रोल नाही, त्यामुळे जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. शेवटी नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे सर्व चिठ्ठीत नमूद करून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जुन्नर येथे घडली आहे. दशरथ केदारी असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
या घटनेची नोंद वडगाव आनंद (ता:जुन्नर) येथील रानमळा येथे घडल्याने, आळेफाटा येथील पोलीस स्टेशनमध्ये याची नोंद करण्यात आली. त्यानंतर, आळेफाटा येथेच शवविच्छेदन करून रात्री उशिरा उदापूर येथील बनकरफाटा या ठिकाणी त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवार रोजी जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी बनकरफाटा येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या राहत्या घरी भेट देऊन दशरथ केदारी यांच्या मातोश्री, पत्नी, मुलगा, मुलगी व इतर नातेवाइकांना समक्ष भेट देऊन त्यांचे सांत्वन केले व शासनाकडून तातडीच्या मदतीचे आश्वासन दिले. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते लक्ष्मण शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी तहसीलदार रविंद्र सबनीस यांच्याशी चर्चा करून या पीडित कुटुंबाला जास्तीतजास्त आर्थिक मदत करण्याची विनंती केली.