लष्कर : कॅम्प भाग हा बहुभाषिक कॉस्मोपोलिटीयन सांस्कृतिक परिसर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळाखंडात ब्रिटिश लष्करी छावणी भाग असल्याने या परिसरात हिंदु, शीख, मुस्लिम, पारशी, ख्रिश्चन असल्याने या भागाला ऐतिहासिक महत्त्व असून भारतात इतर कोठेही धार्मिक हिंसा भडकली तरी त्याचा तिळमात्र परिणाम कॅम्प भागात होत नाही. ही कॅम्प भागातील खासियत असून याचे कारण अनेक वर्षांपासून हिंदू -मुस्लिम यांच्या असलेले स्नेह व जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध होय.
कॅम्प भागात रमजान महिना व गणेश चतुर्थीनिमित्त सिध्दार्थ ग्रंथालय व कर्तव्य फाउंडेशनतर्फे सर्वधर्मिय खजूर-मोदक म्हणजे रोजा व उपवास सामुदायिकरित्या अदा करण्याच्या कार्यक्रमाचे सिद्धार्थ वाचनालयाच्या आवारात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून कॅम्प भागातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन दिसून आले.
गेल्या अनेक वर्षांपासून कॅम्प भागातील दिवंगत पत्रकार महेश जांभूळकर यांच्या पुणे मीडिया वाच व सिद्धार्थ वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने पवित्र रमझान महिन्याच्या चतुर्थीच्या दिवशी खजूर व मोदकद्वारे या उपवास सोडण्याचा कार्यक्रम नित्यनियमाने सुरू होता. परंतु दुर्दैवाने गेल्या वर्षी जांभूळकर यांचे निधन झाल्याने यावर्षी हा कार्यक्रम कर्तव्य प्रतिष्ठान व सिद्धार्थ वाचनालय यांच्या वतीने घेण्यात आला.
विविध धर्मियांच्या मिरावणुकींचे मुस्लिम समाजाकडून स्वागत
कॅम्प भागात होणाऱ्या विविध समाजाच्या धार्मिक, सामाजिक मिरवणुकांचे स्वागत गाय कसाई मस्जिद उर्फ कुरेशी मस्जिद या ठिकाणी पूर्वापार पद्धतीने केले जाते. यामध्ये हिंदु सणांमध्ये गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणूक, शिवजयंती मिरवणूक, आंबेडकर जयंती मिरवणूकिचे स्वागत कोहिनुर हॉटेल या ठिकाणी मुस्लिम समाज व संघटना मार्फत नेहमीच स्वागत केले जाते.रमजानमध्ये येणाऱ्या लगतच्या गणेश चतुर्थी निमित्त सर्व धर्मीयांच्या हस्ते मुस्लिम बांधवांना खजूर भरवून त्यांचा उपवास सोडवतात तर तर मुस्लिम नागरिक हिंदु धर्मियांना मोदक भरवितात. असा हिंदुमुस्लिम भाईचाऱ्याचा कार्यक्रम प्रतिवर्षी लष्कर परिसरामध्ये घेतला जाते.
''रमजान व चतुर्थीनिमित्त खजूर-मोदक कार्यक्रमातून सर्व धर्मियांनी दिलेला सामाजिक एकतेचा संदेश खरोखरच कौतुकास्पद असल्याचे लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांनी सांगितले.''