पुणे/ किरण शिंदे: पुण्यातील लोहगाव परिसरात एका हॉस्पिटलमध्ये नर्स चे काम करणाऱ्या 21 वर्षीय तरुणीने 7 एप्रिल रोजी हॉस्पिटलमध्येच विषारी इंजेक्शन टोचून घेऊन आत्महत्या केली होती. विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तपासांती याप्रकरणी आता या तरुणीच्या विवाहित प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानेच या तरुणीणीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे निष्पन्न झाले आहे.
बापू किसन मैद (वय 22, संभाजीनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर अश्विनी देविदास राठोड (वय 21) या तरुणीने आत्महत्या केली होती. मयत तरुणीचे वडील देविदास नारायण राठोड (वय 54) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी आणि आरोपी एकाच गावचे रहिवासी असल्याने त्यांची आधीपासून ओळख होती. दोघात प्रेम संबंधही होते. मात्र आरोपीचे लग्न झाल्याने तरुणीने त्याच्याशी बोलणे कमी केले होते. तरीही आरोपी वारंवार तिला त्रास देत होता. नवीन गाडी घेण्यासाठी तिच्याकडे पैशाची मागणी करत होता. पैसे दिले नाही तर तो तिला मारहाण करायचा. या मारहाणीला कंटाळूनच अश्विनी राठोड या तरुणीने हॉस्पिटलमध्येच इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली होती.
पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तपासानंतर पोलिसांनी याप्रकरणी आरोपी बापू मैद याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक साळवी अधिक तपास करत आहेत.