पुणे: बुधवार पेठेतील भाऊ रंगारी गणपती मंदिरा जवळ असलेल्या जुन्या लाकडी दुमजली असलेल्या देवरुखकर वाड्याला मंगळवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास आग लागली. मंदिर परिसरातील अरूंद गल्लीत आग लागल्यानंतर परिसरात घबराट उडाली. वाड्यामध्ये आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून ३फायरगाड्या व ३ वॉटर टँकर रवाना करण्यात आले होते. दुमजली वाड्यात सध्या कोणी वास्तव्यास नसल्याने सुदैवाने जीवित हानी टळली. मात्र आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही.
भाऊ रंगारी गणपती मंदिराजवळ असलेल्या गल्लीत खाद्यपदार्थ, रद्दी, इलेक्ट्राॅनिक्स साहित्य विक्रीची दुकाने आहेत. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास जुन्या लाकडी वाड्याला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. वाड्याच्या परिसरातील एका दुकानाला आग लागली. लाकडी वाड्याने पेट घेतल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले. . अग्निशमन दलाचे सहा बंब आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.मात्र अरुंद गल्लीत बंब पोहचण्यास अडथळ्यांचा सामान करावा लागेला. आग लागल्यानंतर बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. या जुन्या वाड्यात सध्या ट्रॉफी बनवण्याचे मोठ्या प्रमाणातसाहित्य ठेवले आहे. या साहित्याने पेट घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर झाला होता. दलाच्या जवळपास १० अधिकारी व ४० जवानांनी आग इतरञ पसरु न देता धोका टाळला. कुणीही जखमी वा जिवितहानी नाही. जवानांनी पाण्याचा मारा करून अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली आग नियंत्रणात असून कुलिंग करण्याचे काम सुरु आहे. आगीचे कारण सद्यस्थितीत समजू शकले नसल्याचे अग्नीशामक दलाच्या जवानांनी सांगितले.