धनकवडी : गंगाधाम रस्त्यावरील गाेदामांना रविवारी सकाळी भीषण आग लागली. विविध वस्तू, साहित्य ठेवलेल्या सुमारे अठरा ते वीस गाेदामातील काेट्यवधी रूपयांचे साहित्य भस्मसात झाले. शहरातील अग्निशमन केंद्राच्या वीस गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करीत सहा तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने या घटनेत काेणी जखमी झाले नाही. दरम्यान, ही आग का लागली याचा शाेध घेण्यात येत आहे.
बिबवेवाडी परिसरातील गंगाधाम रस्त्यावर काकडे चाैकाजवळील गाेदामाला आग लागल्याची वर्दी रविवारी सकाळी पावणे नउ वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षास मिळाली. त्यानंतर काेंढवा आणि गंगाधाम अग्निशमन केंद्रातील गाड्या घटनास्थळाकडे रवाना झाल्या. आकाशात दूरवरून धुराचे लाेट दिसून येत हाेते. आगीचे राैद्र रूप लक्षात घेता मदतीसाठी अतिरिक्त कुमक पाठविण्यात आली.
गाेदामामध्ये मांडव तसेच सजावटीचे साहित्य,ऑटाेमाेबाईल्स स्पेअर पार्टस, कपडे, साबण, तेल, बिस्किटे यासह टायर, ऑईल पेंट, काच, रबर, फर्निचर, इलेक्ट्रीक वायरिंग आदी प्रकारचे साहित्य ठेवण्यात आले होते. उन्हाळा आणि त्यामध्ये वेगाने वाहणारे वारे यामुळे काही मिनिटांमध्ये वणवा लगतच्या इतर गाेडाउनमध्ये पसरला आणि आगीने राैद्र रूप धारण केले. आग लागल्याचे समजताच व्यापाऱ्यांसह परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.
पुणे अग्निशमन दल, पुणे कॅन्टाेमेंट आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या फायरगाड्या, पाण्याचे टॅंकर घटनास्थळी दाखल झाली. पुणे महापालिकेने १० पाण्याचे टँकर मदतीसाठी पाठविण्यात आले होते. मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांसह १५ अधिकारी आणि शंभर जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली तसेच शेजारच्या वस्तीत आग पसरु नये याचीही काळजी घेतली. पावणे नउ वाजता लागलेली आग दुपारी अडीच वाजेपर्यंत धुमसत हाेती. आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत कुलिंगचे काम सुरू हाेते.
वाऱ्यामुळे आग वेगाने पसरली
गंगाधाम रस्त्यावर सुमारे शंभर गाेदामे आहेत. उन्हाळा आणि त्यामध्ये वारे वाहत असल्याने वेगाने वणवा पसरला. मंडप आणि सजावटीच्या साहित्य पेटताच आगीने राैद्र रूप धारण केले. आग एवढी माेठी हाेती की दूरवरून धुराचे लाेट दिसून येत हाेते. जेसीबीच्या सहाय्याने आग लागलेल्या गाेदामाचे पत्रे ताेडून पाण्याचा मारा केला.
अरूंद रस्त्यांमुळे जवानांना अडथळे
घटनास्थळी व्यापाऱ्यांसह नागरिकांची माेठ्या संख्येने घटनास्थळावर जमू लागले. त्यामुळे गंगाधाम रस्त्यावर वाहतुक काेंडी झाली हाेती. अरूंद रस्त्यामुळे आग लागलेल्या गाेदामापर्यंत पाेहचण्यासाठी अग्निशमन दलाच्या वाहनांना अडथळे येत हाेते. दरम्यान, चिंतामणी लाॅजिस्टिक परिसरातील माल वाहतुकीसाठी उभा केलेले वाहने बाजूला घेत तेथून पेट घेतलेल्या गाेदामावर पाण्याचा मारा करीत आग विझविण्यात आली.
टिंबर मार्केट नंतरची माेठी घटना
एक महिन्यापूर्वी टिंबर मार्केटमध्ये लागलेल्या आगीत पाच लाकडाच्या गाेडाउनसह लगतची शाळा आणि आठ घरांचे नुकसान झाले हाेते. त्यानंतर गंगाधाम रस्त्यावरील गाेडाउनला लागलेली ही या वर्षीची सर्वात माेठी आगीची घटना आहे.
आग कशामुळे लागली याचा शाेध घेतला जातोय
गाेदामे बंद असल्याने आग लागल्याचे नागरिकांच्या वेळीच निदर्शनास आले नाही. वाऱ्यामुळे आग पसरल्याने आमच्यापुढे आव्हान निर्माण झाले. पेंट, फर्निचर,सजावटीचे साहित्य जळाल्याने आग वाढली. ही आग कशामुळे लागली याचा शाेध घेतला जात आहे. - देवेंद्र पाेटफाेडे, मुख्य अग्निशमन अधिकारी
... अन्यथा आणखी माेठे नुकसान झाले असते।
गाेदामामध्ये खूप माेठी आग पसरली हाेती. अग्निशमन दलाच्या जवानांनी पत्रे ताेडून पाण्याचा मारा करीत आग विझविल्याने आग लगतच्या भागात पसरली नाही अन्यथा आणखी माेठे नुकसान झाले असते. - परमेश्वर सनादे , काकडे वस्ती प्रत्यक्षदर्शी