पुणे : पुण्यातील कोथरुड येथील चांदणी चौकात काल दुपारी अचानक एका खासगी बसने पेट घेतला. आग लागल्याचे समजताच कोथरुड आणि पाषाण अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवत असताना कोथरुड अग्निशमन दलाचे अधिकारी गजानन पाथरुडकर (वय ५४) हे गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे पाथरुडकर यांचा काल वाढदिवस होता.
पेट घेतलेल्या बसवर पाण्याचा फवारा मारत असताना अचानक भडका उडाला. यामध्ये गजानन पाथरुडकर हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने चेलाराम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना सूर्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या चेहऱ्याला आणि हाताला भाजले आहे. या घटनेत ते २० ते २५ टक्के भाजले असून, सध्या त्यांच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुण्यातील कोथरुड येथील चांदणी चौकात बसने अचानक पेट घेतला. ही घटना काल (रविवार) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. बसने अचानक पेट घेतल्याने बसमधील प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आले. या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच कोथरुड आणि पाषाण अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवत असताना अचानक भडका उडाल्याने अग्निशमन दलाचे अधिकारी गजानन पाथरुडकर हे जखमी झाले. तरीही अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच बसची आग विझविली. मात्र, तोपर्यंत सर्व बस संपूर्ण जळून खाक झाली.