पुणे : शहरात घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. अलंकार, वानवडी आणि कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन घरफोडीच्या घटना घडल्या असून, यात चोरट्यांनी रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने असा तब्बल २४ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरल्याचे समाेर आले आहे.
पहिली चोरीची घटना अलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरतकुंज कॉलनी, एरंडवणा येथे घडली. याप्रकरणी एका ६१ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २४ जानेवारी रोजी सकाळी १० च्या दरम्यान घडली. चोरट्याने बाल्कनीतून फिर्यादींच्या घरात प्रवेश करून २ लाख १० हजारांचे दागिने चोरले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पंकज पवार करत आहेत.
दुसरी घटना वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सॅन्डलवूड अपार्टमेंट, वानवडी येथे घडली. याप्रकरणी सनत सोळंकी (वय ४१, रा. वानवडी) यांनी फिर्याद दिली. ही घटना १९ ऑगस्ट २०२३ ते १० नोव्हेंबर २०२३ दरम्यान घडली. फिर्यादी घरी नसताना अज्ञात चोरट्याने घराची डुप्लिकेट चावी बनवून त्याच्या घरात प्रवेश करून बेडरूम मधील कपाटातील २० लाख ५० हजारांचे सोन्याचे आणि डायमंडचे दागिने चोरले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक संतोष गायकवाड करत आहेत.
तिसरी घटना कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी जावेद सलीम खान (वय ४२, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना १२ ते १६ जानेवारी दरम्यान घडली. फिर्यादी जावेद खान हे कुटुंबीयांसोबत गुजरात येथे गेले होते. याचा फायदा घेत चोरट्याने बेडरूमच्या खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातील १ लाख रोख रक्कम, ५५ ग्रॅम सोन्याचे दागिने असा १ लाख ९० हजार ८६ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.