पुणे : हडपसर गाडीतळ चौकातून सोलापूर रस्ता तसेच सासवडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी गाडीतळ येथे महापालिकेच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराज उड्डाणपूल उभारले आहेत. मात्र, मुळ पूलावर जोड पुल उभारल्याने दोन्ही पूल कमकुवत झाले असून वारंवार ते दुरूस्तीसाठी बंद ठेवावे लागत आहेत. ही बाब लक्षात घेऊन सोलापूर तसेच सासवड रस्त्यावरील कोंडी फोडण्यासाठी फातीमा नगर ते मांजरी फाटया पर्यंत उड्डाणपूल उभारण्यात यावा अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
“राष्ट्रीय महामार्ग क्रमांक़ 65 (जुना 9) पुणे ते मछ्चली पट्टणम असा असून हा महामार्ग महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश अशा चार राज्यांना जोडतो तसेच हडपसर येथे हा मार्ग शहराचे पूर्वेचे प्रवेशद्वार आहे. महापालिकेने या ठिकाणी उड्डाणपूल उभारलेला असला तरी त्याला जोडणारा पूल उभारल्याने हा पूल कमकुवत झालेला असून सातत्याने दुरूस्तीसाठी बंद ठेवावा लागतो. परिणामी, या रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने फातिमानगर ते मांजरी फाटा (सोलापूर रस्ता) पर्यंत हा उड्डाणपूल अखंड जोडल्यास सोलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कायमची सुटेल त्यामुळे जुना पूल पाडून नवा पूल उभारावा अशी मागणी प्रमोदनाना भानगिरे यांनी केली. त्यावर गडकरी यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून तातडीनं याबाबत दखल घेण्याचे आश्वासन दिले असल्याचे प्रमोद नाना भानगिरे यांनी सांगितले.
चुकीचे उडडाणपुल पाडा
हडपसरमधील संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज उड्डाणपुलामुळे पाडून सलग पूल बांधण्याची मागणी शिवसेना शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. हडपसर पुलावरील गर्डरचे बेअरिंग खराब झाल्याने तो वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. याशिवाय या पुलाची उंची अतिशय कमी असल्याने पुलाशेजारून जाणारी अवजड वाहने पुलाच्या पिलरला धडक आहेत, हा धोका टाळण्यासाठी पुलाच्या पिलरपासून विशिष्ठ अंतरावर सिमेंटचे बॅरिकेटस् उभारण्यात आले आहेत मात्र यातून रस्त्यावर जाणाऱ्या वाहनांचा याचा अडथळा होत आहे असे प्रमोदनाना भानगिरे यांनी निवेदनात नमुद केले आहे.