पुणे : हांडेवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या प्रभू श्रीराम पुर्णाकृती शिल्पाची पायाभरणीचे भूमिपूजन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि शिवसेना मुख्य प्रतोद तथा महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते झाले.
हडपसर-हांडेवाडी रस्त्यावर श्रीराम चौकात शिवसेना शहरप्रमुख प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे यांच्या पुढाकारातून प्रभू श्रीरामाचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येत आहे. यावेळी शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख उल्हास तुपे, रमेश कोंडे, शिवसेना महिला शहर प्रमुख पूजा रावेतकर, शहर संघटक श्रीकांत पुजारी, शरद मोहोळ,तुषार हंबीर, लक्ष्मण आरडे आदिं सह शिवसेना पदाधिकारी व नाना भानगिरे यांचा मित्र परिवार मोठया संख्येने उपस्थित होते.
चांगल्या कामासाठी पुढे जाणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणे शिवसेनेचे कर्तव्य आहे. प्रमोद भानगिरे निस्वार्थीपणे समाजामध्ये काम करीत असल्यानेच मुख्यमंत्र्यांनी सगळ्यात जास्त निधी उपलब्ध करून दिला आहे, असे आमदार भरत गोगावले यांनी स्पष्ट केले. श्रीरामाचा पुतळा उभारण्यासाठी काहीनी विरोध केला. मात्र, एखादं काम मनांवर घेतलं की ते पूर्ण करायचं हा नानांचा स्वभाव आहे. मंत्रालयामध्ये प्रत्येक विभागाकडे जातीने पाठपुरावा करून मंजुरी मिळविली आहे, असे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी काढले.
हांडेवाडी येथे ७५ फूट लांब आणि २३ फूट उंच असे श्रीरामाचे शिल्प उभारले जाईल. लवकरच महंमदवाडीचे महादेववाडी नामकरण करून येथील तुळजाभवानी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही उभारला जाणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हडपसर मतदार संघात दिड वर्षांत सुमारे दोनशे कोटींचा निधी उपलब्ध करून हडपसर, मुंढवा, केशवनगर, मांजरी आणि बारा वाड्यांतील विकास कामे केली जात आहेत असे शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी सांगितले.