आळेफाटा : आळेफाटा येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या अट्टल दरोडोखोरांच्या टोळीतील चार जणांना जेरबंद करण्यात आळेफाटा पोलिसांना यश मिळाले आहे. यातील तिघेजण फरार झाले आहेत. तर जेरबंद केलेला एकजण मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी दिली.
नवनाथ राजू पवार (वय 21 वर्ष रा ढोकी ता पारनेर) अंकुश खंडू पवार, प्रवीण दत्तात्रेय आंबेकर (वय 25 दोघे (रा तांबवाडी, वडगाव सावताळ ता पारनेर) व अनिकेत बबन पवार (वय 20 रा बोरी साळवाडी ता जुन्नर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर फौजदार रघुनाथ शिंदे सहाय्यक फौजदार चंद्रशेखर डुंबरे पोलीस हवालदार लहानु बांगर, पदंसिंह शिंदे सोमवार (दि 9) रोजी रात्रगस्त करत असताना त्यांना नगर कल्याण महामार्गावर आळे गावचे हद्दीत आळेफाटा बाजूने आलेली मोटार कार ही संशयितरित्या भरधाव वेगाने जाताना आढळून आली. कार थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र सदर कार जोरात पुढे गेली यानंतर पोलीस पथकाने सिनेस्टाईलने पाठलाग करून कार थांबवली असता यातील सात जण अंधाराचा फायदा घेऊन बाजुच्या ऊसाच्या शेतात गेले. पोलीस पथकाने पन्हा पााठलाग करत यातील चार जणांना ताब्यात घेतले.
दरम्यान त्यांचे नावे विचारली असता त्यांनी आपली नावे नवनाथ पवार, अनिकेत पवार, अंकुश पवार, प्रवीण आंबेकर अशी सांगितली. कारची तपासणी केली असता कारमध्ये कटावणी, लोखंडी हातोडा, चाकू, कोयता, कटर, चिकटपट्टी, टॉर्च मिरचीपूड, मोबाईल असे साहित्य मिळून आले. अधिक चौकशी केली असता त्यांनी आळेफाटा येथील पुणे नाशिक महामार्गावरील वरील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी आले असल्याचे सांगत यातील फरार आरोपींची नावे सांगितली. पोलिसांनी सदर गुन्ह्यात सखोल तपास केला असता सदर आरोपी सराईत गुन्हेगार असून दरोडा, जबरी चोरी, मोक्का सारखे गुन्हे त्यांचेवर आळेफाटा, पारनेर व कल्याण पोलीस ठाण्यांत दाखल असल्याची माहिती निष्पन्न झाली. तर यातील अटक आरोपी खंडू पवार याच्यावर कल्याण पोलीस ठाण्यामध्ये मोक्का अंतर्गत कारवाई झाली असून तो एक वर्षापासून फरार होता. सदर आरोपींकडून 3 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांनी यापूर्वी केलेल्या गुन्ह्यातील चांदी, रोख रक्कम, इलेक्ट्रीक मोटर कसा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस निरीक्षक डॉ अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाकाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर पुढील तपास करत आहेत.