नारायणगाव (पुणे) : जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडी आणि खोडद येथील गरजू विवाह इच्छुक दोन तरुणांशी नावे बदलून विवाह करून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला नारायणगाव पोलिसांनी नाशिकमधून गजाआड केली असल्याची माहिती जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर व सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
जयश्री काळू घोटाळे (वय ३५ ) (रा. मुरंबी शिरजगाव ता. त्र्यंबकेश्वर नाशिक) मीरा बंसी विसलकर (वय ३९) व तुकाराम भाऊराव मांगते (वय २३) (रा. अंबुजा वाडी, इगतपुरी, घोटी, नाशिक), बाळू भिकाजी काळे (वय ४६ ) (रा. बोटा तालुका संगमनेर), शिवाजी शंकर कुरकुटे (वय ६४ ) (रा. कुरकुटेवाडी, बोटा, संगमनेर), बाळू गुलाब सरवदे (वय ४१) (रा. गुंजाळवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद सागर प्रभाकर वायकर (वय ३३, रा. गुंजाळवाडी, आर्वी, ता. जुन्नर) यांनी १ जून २०२३ला नारायणगाव पोलिस स्टेशनला दिली होती.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मे २०२३ या महिन्यात गुंजाळवाडी येथील सागर वायकर यांचा विवाह बाळू सरवदे व मीरा विसलकर यांच्या यांच्या मध्यस्थीने संध्या बदादे (वय २३, रा. विठ्ठल नगर, पोस्ट निळवंडी, ता. दिंडोरी, जि. नाशिक) हिच्याशी जुन्नर येथे झाला. त्यानंतर १७ मे २०२३ला संध्याची मावशी मीरा हिने यांनी संध्याला घेऊन जाण्यासाठी चार ते पाच लोकांना घेऊन घरी आल्या व तिला आमच्या सोबत घेऊन जायचे असे सांगितले असता वायकर यांनी नकार दिला. मात्र मीरा यांनी वकिलाची धमकी देऊन संध्याला त्या ठिकाणाहून घेऊन गेले व दोन दिवसांनंतर पाठवून देते असे सांगितले. परंतु दोन दिवसांनीही मीरा विसलकर यांनी पाठवते असे कारण सांगितले. २८ मे रोजी वायकर यांनी मीराला फोन केला असता मीरा यांनी सांगितलं की संध्या कुठेतरी पळून गेली आहे. तुम्हाला मी दुसरी मुलगी देते. तुम्ही कुठेही गाजावाजा नका व पोलिसात जाऊ नका असे सांगितले. यावरून वायकर यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तसेच खोडद येथील हरीश बाजीराव गायकवाड या तरुणाला मीरा विसलकर व शिवाजी कुरकुटे यांनी अश्विनी रामदास गवारी (वय २३, रा. मु. मोगरे, पो. वाघिरे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक) या मुलीबरोबर २३ मार्च २०२३ ला आळंदी येथील इंद्रायणी मंगल कार्यालय येथे लग्न लावून दिले. त्यानंतर गायकवाड यांची ही फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. वायकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारायणगाव पोलिसांनी तपास केला असता वायकर यांची पत्नी संध्या विलास बदादे व हरीश गायकवाड यांची पत्नी अश्विनी रामदास गवारी या दोन्हीही महिला एकच असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. तालुक्यातील अविवाहित तरुणाशी मध्यस्थींच्या मार्फत एकाच मुलीने काही महिन्यांच्या अंतरावर लग्न केले होते. लग्नानंतर मुलगी चार ते पाच दिवस नवरदेवाच्या घरी राहून लग्नात बनवलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम व आईवडील आजारी असल्याचे खोटे सांगून लाखो रुपये घेऊन जात असे. त्यानंतर फोन बंद करून पुन्हा येत नसे. वायकर व गायकवाड या तरुणांची प्रत्येकी दोन ते अडीच लाख रुपयांचे फसवणूक झाली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याने त्याचाच गैरफायदा घेऊन विवाहासाठी अडलेल्या इच्छुकाबरोबर मुलीचे लग्न लावून द्यायचे आणि लग्नाच्या चार ते पाच दिवसांनंतर विवाहित मुलाकडून लग्नात बनविलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन पळून जायचे अशा प्रकारची फसवणूक करण्याचे प्रमाण वाढत आहे. आजपर्यंत या टोळीने वीस ते बावीस तरुणांबरोबर अशा पद्धतीने लग्न लावून फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे लग्न जमवताना नातेगोते, पाहुणे मित्र व घरदार पाहूनच खात्री झाल्यानंतर लग्न करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलिस उपनिरीक्षक विनोद धुर्वे व पोलिस कर्मचारी यांनी केला.