किरण शिंदे
पुणे: पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत चारित्र्याच्या संशयावरून महिलेचा निर्घृणपणे खून करण्यात आलाय. रविवारी मध्यरात्री घडलेली घटना आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलीस आणि पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव घटनास्थळी दाखल झाले आहेत. आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. माधुरी मनोहर मोरे (वय ४७) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. धानोरीतील मुंजोबा वस्ती लेन नंबर १० या ठिकाणी हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरे पती-पत्नी मागील काही दिवसांपासून सातत्याने भांडण होत होते. आरोपी पती हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा आहे. याच कारणावरून त्यांच्यात भांडण व्हायचे. सोमवारी पहाटेच्या सुमारास देखील त्यांच्यात याच कारणावरून भांडण झाले. आणि त्यानंतर आरोपी पतीने रागाच्या भरात घरातील गॅस सिलेंडर पत्नीच्या डोक्यात घातला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पत्नी माधुरी मोरे यांचा मृत्यू झाला.
दरम्यान सोमवारी सकाळी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर झोन ४ चे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवण्याची तयारी सुरू केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.