पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर चाकूने वार करून तिचा खून केल्याची घटना लोहगावमधील संतनगर भागात घडली. याप्रकरणी पतीला विमानतळ पोलिसांनी अटक केली. रूपाली उर्फ बबिता आशिष भोसले (वय ३५, रा. संतनगर, लोहगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आशिष सुनील भोसले (वय ३२, रा. संतनगर, लोहगाव) याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत स्वप्निल बाळासाहेब खांदवे यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भोसले दाम्पत्य लोहगाव भागातील संतनगर परिसरात भाड्याने खोली घेऊन राहत होते. आशिष हा सफाई कामगार आहे. गेल्या काही महिन्यांपासून आशिष पत्नी रूपालीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ करत होता.
शनिवारी रात्री दोघांमध्ये वाद झाला. वादातून त्याने स्वयंपाकघरातील चाकूने रूपालीवर वार केले. या घटनेची माहिती शेजाऱ्यांना मिळाली. ही माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. रूपालीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला. पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. आराेपी आशिषला पोलिसांनी अटक केली असून, सहायक पोलिस निरीक्षक संजय धामणे तपास करत आहेत.