पुणे/नाशिक - शहरातील म्हसरूळ शिवारातील एका कथित आधाराश्रमात चौदा वर्षाच्या शाळकरी मुलीवर आधाराश्रमाच्या संचालकाकडून बलात्कार केल्याची घटना गुरुवारी (दि.२४) सकाळी उघडकीस आली आहे. म्हसरुळ पोलिसांनी संशयित आरोपी हर्षल बाळकृष्ण मोरे (२८,मुळ रा.सटाणा) यास बेड्या ठोकल्या आहे. दोन दिवसांपुर्वीच नाशिक शहरापासून जवळच असलेल्या एका ‘आधारतिर्थ’ नावाच्या आधाराश्रमात चार वर्षीय चिमुकल्याचा गळा दाबून खून करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर, आता भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. वाघ यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.
म्हसरूळ द किंग फाउंडेशन ज्ञानपीठ गुरुकुल आधार आश्रमात संचालकानेच अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी, गुन्हा दाखल झाला असून आरोपीच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. तर, दिपाली खन्ना महिला पोलिस अधिकारी अधिक तपास करत आहेत, अशी माहिती चित्रा वाघ यांनी दिली. तसेच, राज्यातील सर्व आधार आश्रमांचे ऑडिट व्हावे. किती आधार आश्रम नोंदणीकृत आहेत आणि किती बेकायदेशीररीत्या चालवले जात आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच या प्रकारानंतर आश्रमांचे कायदेशीर मान्यता लक्षात घेऊन बेकायदेशीर चालवण्यात येत असलेले आश्रम उजेडात आलेच पाहिजे, असेही वाघ यांनी म्हटले आहे.
नाशिक शहर व परिसरातील काही कथित खासगी बेकायदेशीर आधाराश्रम, वसतीगृहांमधील गैरप्रकार वारंवार समोर येत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तसेच समाजाचा स्वयंसेवी सामाजिक संस्थांच्या कार्याकडे बघण्याचा दृष्टीकोनदेखील बदलू लागला आहे. म्हसरुळ शिवारात अशाच एका कथित द किंग फाउण्डेशन नावाच्या संस्थेकडून चालविले जाणारे ज्ञानदिप गुरुकुल आधाराश्रमात एका अल्पवयीन मुलीवर महिनाभरापुर्वी तेथील स्वयंघोषित संचालक संशयित हर्षल मोरे याने पिडित फिर्यादी अल्पवयीन मुलीला बळजबरीने इमारतीच्या पार्किंगमधील पत्र्याच्या खोलीत बोलावून हातपाय दाबून देण्याच्या बहाण्याने अश्लील व्हिडिओ दाखवून लैंगित अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
मुलीस हॉस्टेलमधून काढण्याची धमकी
हा प्रकार संशयिताने १३ ऑक्टोबर२०२२ रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास केला. यावेळी पिडितेने नकार दिला असता तिला त्याने होस्टेलमधून काढून टाकण्याची धमकी दिली. पिडितेचा हात बळजबरीने पकडून तिला पत्र्याच्या शेडमध्ये घेऊन जात हातपाय दाबून देण्यासाठी भाग पाडले. यावेळी अश्लील व्हिडिओ मोबाइलमध्ये पिडितेला बळजबरीने दाखविला. यानंतर पिडितेसोबत बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिडिता ही जिल्ह्यातील एका आदिवासी तालुक्याील मुळ रहिवाशी आहे.
आरोपीला केली अटक
घटनेची माहिती मिळताच म्हसरुळ पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पिडितेला विश्वासात घेत तिची रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करुन घेत संशयित हर्षल यास ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध पिडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी बलात्कार, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो), अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम (ॲट्रोसिटी) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास सहायक पोलीस आयुक्त दिपाली खन्ना यांच्याकडे देण्यात आला आहे