कामशेत (पुणे) : मित्राबरोबर लग्न करण्यास नकार दिला, असे म्हणत कामशेत येथील एका मुलीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.३१) सकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात हल्लेखोरासह तीन जणांवर गुन्हा दाखल आहे.
सुनील रामदास ढोरे (वय २२) व अद्वैत ऊर्फ श्री भरत जाधव (वय २३, दोघेही रा. मोरया कॉलनी, वडगाव मावळ, ता. मावळ) यांच्यासह अज्ञात हल्लोखोरावर गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील इंद्रायणी कॉलनी परिसरामध्ये फिर्यादी सोमवारी (दि. ३१ ऑक्टोबर) सकाळी पावणेसहाच्या सुमारास इंद्रायणी कॉलनी परिसरातील कचरा टाकण्यास जात होत्या. त्यावेळी अज्ञात आरोपीने त्यांच्या डाव्या कानावर मानेजवळ वार केला. यात फिर्यादी गंभीर जखमी झाल्या.
यावेळी हल्लेखोर म्हणाला की, माझा मित्र सुनील ढोरे यांच्याशी लग्न करण्यास तू नकार का दिला, असे म्हणत जिवे मारण्याच्या उद्देशाने पुन्हा धारदार कोयत्याने वार केला. मुलीने तो दोन्ही हाताने अडविला. यामध्ये तिच्या दोन्ही हातांना दुखापत झाली आहे.
पोलिसांनी सुनील ढोरे, अद्वैत जाधव यांना मोठ्या शिताफीने अटक करून कोर्टात हजर केले. त्यावेळी त्यांना ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कामशेत पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शुभम चव्हाण तपास करीत आहेत.