धायरी: अज्ञात कारणांवरून एका ३६ वर्षीय व्यक्तीचा धारदार हत्याराने वार करून निर्घृणपणे खून करण्यात आला असून हा प्रकार सोमवारी सकाळी उघडीस आला आहे. राहुल चंद्रकांत आटोळे ( वय: ३६ वर्षे, रा. गोसावी वस्ती नांदेड ता. हवेली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सिंहगड रस्ता परिसरातील नांदेड भागात राहणारे राहुल आटोळे हे पेरू विक्रीचा व्यवसाय करतात. सोमवारी सकाळी काही नागरिकांना रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झुडपात एक मृतदेह आढळून आला. याबाबत नागरिकांनी हवेली पोलिसांना कळविले. घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे , पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिंदे, पोलीस हवालदार अशोक तारू, पोलीस नाईक संतोष भापकर, राजेंद्र मुंडे, प्रवीण ताकवणे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. धारदार हत्याराने वार करून मृतदेह झुडपात टाकून देण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला आहे. त्यांचा खून कोणत्या कारणावरून झाला याचा शोध पोलीस घेत आहेत. मृतदेहाचा पंचनामा करण्याचे काम सुरू असून त्यानंतर शवविच्छेदनसाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे. पुढील तपास हवेली पोलीस करीत आहेत.