ओतूर : डिंगोरे (ता. जुन्नर) येथील जालिंदर उकिरडे यांनी आपल्या कन्येच्या विवाहातील मानपानाचा खर्च टाळून डिंगोरे व उदापूर गावातील शाळांना मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे उकिरडे यांच्या आदर्शवत उपक्रमाचे जुन्नर तालुक्यात कौतुक होत आहे.
यावेळी उदापूर गावातील सरस्वती विद्यालय व डिंगोरे गावातील पुष्पावंती विद्यालय यांना प्रत्येकी ५१ हजार रुपयांचे धनादेश देण्यात आले आहेत. यावेळी जालिंदर उकिरडे म्हणाले की, विवाहप्रसंगी मानपान म्हणून टोप्या, टाॅवेल, फेटे व पुष्पगुच्छ देण्याची पद्धत आहे. या पद्धतीला उकिरडे कुटुंबाने फाटा देत उदापूर येथील सरस्वती विद्यालयाच्या नवीन इमारतीसाठी ५१ हजार व डिंगोरे येथील पुष्पांवती विद्यालयासाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली.
मानपानासाठी दिलेल्या वस्तू टोप्या, टाॅवेल, फेटे, पुष्पगुच्छ लग्न मंडपात टाकून जातात. परिणामी हा खर्च वाया जातो. म्हणून उकिरडे कुटुंबीयांनी हा नवीन पायंडा पाडला आहे.तसेच नाम फाउंडेशनला जालिंदर उकिरडे यांनी त्यांचा पुतण्या प्रशांत यांच्या लग्नाचा मानपानाचा खर्च टाळून ७५ हजार रुपयांचा धनादेश दिला होता.