पांडुरंग मरगजे
धनकवडी : ढाकचा बहिरी म्हणजे सह्याद्रीच्या कातळात लपलेलं श्रद्धास्थान असून, दक्षिणोत्तर पसरलेला हा अजस्र डोंगर, दुर्गवेड्यांसाठी, साहसी ट्रेक करणाऱ्या गिर्यारोहकांसमोर एक आव्हान असले तरी धनकवडी येथील चव्हाण नगरमध्ये राहणाऱ्या श्रीपाद विठ्ठल कडू या केवळ साडेचार वर्षाच्या चिमुरड्याने हे आव्हान लीलया पेलले आणि वडिलांच्या मार्गदर्शनाखाली रखरखत्या उन्हात अवघ्या सहा तासात २७०० फूट उंच ढाक बहिरीवर यशस्वी चढाई केली.
भैरवनाथाच्या नावाने प्रसिद्ध असलेला ढाक बहिरी किल्ला महाराष्ट्रातील कर्जत सांडशी येथे असून, हा ट्रेक सह्याद्रीतील सर्वांत आव्हानात्मक ट्रेक समजला जातो. संपूर्ण ट्रेक पूर्ण करण्यासाठी श्रीपादला सहा तास लागले. खड्या चढणीच्या या ट्रेकमध्ये ढाक बहिरी किल्ल्यातील भैरोबाची गुहा ९० अंशांच्या खड्या चढणीची असून, एकीकडे उंच पहाड व दुसरीकडे खोल दरी असा सामना करत वेल अथवा दोराच्या साह्याने श्रीपादने यशस्वी चढाई केली.
श्रीपादने योग प्रशिक्षक आणि कराटे प्रशिक्षक असलेले आपले वडील विठ्ठल कडू यांच्या मार्गदर्शनाखाली हा ट्रेक पूर्ण केला. लहान मुलांमध्ये खेळांची आवड निर्माण व्हावी, गड स्वच्छता आणि निसर्ग संवर्धनाची प्रेरणा मिळावी, या हेतूने ढाक बहिरी ट्रेकचे आयोजन केले असल्याचे श्रीपादचे वडील विठ्ठल कडू यांनी सांगितले.
मुलांना घडवण्यात आई-वडिलांचा खूप मोठा हात असतो. आई-वडील मुलांच्या आयुष्याचे शिल्पकार असतात; जे त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना आकार देतात. श्रीपादच्या या कौतुकास्पद कामगिरी मागे आई-वडिलांचे महत्त्वपूर्ण योगदान असून, वयाच्या साडेचार वर्षी आव्हानात्मक कामगिरीबद्दल काय वाटते, याबाबत त्यांनी ‘लोकमतशी बोलताना सांगितले की, गड-किल्ल्यांची भटकंती अत्यंत महत्त्वाची आहे, महाराष्ट्राची ही भूमी शौर्याची, त्यागाची, बलिदानाची आणि स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवरायांची आहे. गड-किल्ले म्हणजे नुसत्या वास्तू नसून, आपल्या मावळ्यांच्या रक्ताने पवित्र झालेली तीर्थस्थाने असल्याचे आपण नेहमी सांगतो, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेताना नवीन ऊर्जा मिळते.