पुणे : दोघेही उच्चशिक्षित. तो एचआर तर ती साफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत आहे. मात्र, सात वर्षात वर्षभरच दोघांनी संसार केला. स्वभावातील तफावत आणि वैचारिक मतभेदामुळे दोघे वेगळे राहत होते. ६ नोव्हेंबर २०२३ रोजी दाखल केलेला दावा ४ डिसेंबर रोजी म्हणजेच २८ दिवसात निकाली काढण्यात आला. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश बी.डी.कदम यांनी हा निकाल दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यानुसार परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल करण्यापूर्वी दोघे १८ महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी वेगळे राहत असल्यास सहा महिन्याचा कालावधी वगळता येतो. या प्रकरणात दोघे सुमारे सहा वर्षे वेगळे राहत आहेत. त्यामुळे हा कालावधी वगळण्याची मागणी अर्जदार वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
राकेश आणि स्मिता (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. दोघांनी अॅड. विजयकुमार ढाकणे, अॅड. राणी ढाकणे, व त्याचे सहकारी अॅड. सारिका पोटभरे, अॅड. विद्यालता कमलेकर, अॅड. रुपाली बागल, अॅड. सिध्दार्थ जाधव, अॅड. संकल्प चव्हाण यांच्यामार्फत कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. . फेब्रुवारी २०१७ दोघांचे पारंपारिक पध्दतीने पाहणी करून विवाह झाला. दोघांनी जेमतेम वर्षभरच संसार केला. त्यानंतर दोघात वाद होऊ लागले. वाद विकोपाला गेल्यानंतर दोघे वेगळे राहू लागले. दोघांना मुलबाळ नाही. दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दावा दाखल केला.
वैचारिक मतभेदामुळे दोघे सहा वर्षांपासून वेगळे राहत होते. दोघे आता एकत्र येणे शक्य नव्हते. परस्पर संमतीने दोघेही घटस्फोट घेण्यास तयार असल्याने दोघांना आणखी सहा महिने थांबविणे योग्य नव्हते. या निर्णयामुळे वेळेची बचत झाली आहे. दोघेही स्वतंत्र्यपणे आयुष्य जगण्यास मोकळे झाले आहेत. तिला तर परदेशात चांगली नोकरी मिळाली आहे.- अॅड. राणी विजयकुमार ढाकणे, अर्जदारांच्या वकील