पुणे : पत्नी उच्चशिक्षित अन् पती सॉफ्टवेअर इंजिनिअर. पत्नी आपल्यावर काळी जादू करते, असा तक्रार अर्ज पतीने चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनसह पोलीस आयुक्त कार्यालयात सादर करूनही त्याची दखल घेण्यात आली नाही. शेवटी पतीने न्याय मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. पतीकडे असलेल्या पुराव्यांवरून न्यायालयाने फौजदारी कलम २०० नुसार तसेच पत्नी, दोन तांत्रिक आणि जवळच्या नातेवाइकांविरुद्ध महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि जादूटोणा कायदा अधिनियम २०१३ तसेच कलम १२० ब, ४०६, ३२४, ३२८, ५०६ व ३४ नुसार नियमित गुन्हेगारी केस दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. निमसे यांनी हा आदेश दिला. एका नामवंत कंपनीमध्ये काम करणाऱ्या तरुणाने पत्नीविरुद्ध २०१७ मध्ये कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र आपल्या मोबाइलमध्ये पतीने हेरगिरी करणारे सॉफ्टवेअर टाकून माझे कॉल रेकॉर्ड कौटुंबिक न्यायालयात सादर केले आणि माझ्या खासगी आयुष्याचा भंग केला असा तक्रार अर्ज पत्नीने पोलिसांकडे सादर केला. त्यामुळे पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, पतीची तक्रार होती की पत्नी, तिची आई आणि जवळचे नातेवाईक आपल्यावर आणि नातेवाइकांवर तांत्रिक बाबांच्या मदतीने काळी जादू करतात. मात्र ठोस पुरावे मिळविण्यासाठी त्याने नाइलाजाने तिच्या मोबाइलमधील रेकॉर्डिंग मिळविले. त्यात अनेक धक्कादायक बाबी मिळाल्या. त्यामुळे पत्नीविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी तक्रार पतीने पोलिसांकडे दाखल केली. मात्र पोलिसांनी त्याच्या तक्रारीची दखल न घेतल्याने त्याने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.
न्यायालयाने त्याच्या तक्रार अर्जाची दखल घेतली आणि अर्जदाराने दाखल केलेला दस्ताऐवज पुरेसा असल्याने सध्या वेगळ्या चौकशीची गरज नाही. नियमित गुन्हेगारी केस दाखल करण्याच आदेश न्यायालयाने दिले. ॲड. पप्पू मोरवाल यांनी न्यायालयात अर्जदाराची बाजू मांडली.