पुणे : गरोदरपणाचा काळ हा प्रत्येक महिलेसाठी अतिशय आनंद देणार असला तरी या काळात महिलांना मानसिक ताण-तणावाचा सामना करावा लागू शकतो. साधारणतः गर्भावस्थेच्या काळात २० टक्के महिलांना ‘मूड डिसऑर्डर’चा त्रास जाणवतो, अशी माहीती स्त्रीराेग तज्ज्ञांनी दिली.
दरवर्षी १० ऑक्टाेबर हा जागतिक मानसिक आराेग्य दिन पाळला जाताे. या दिनाला गर्भवती महिलांचे मानसिक आराेग्याबाबत अनेक समस्या समाेर आल्या आहेत. मात्र अनेक महिलांना याची जाणीवही नसते. कधीकधी नैराश्याचा कालावधी बराच काळ टिकतो आणि बाळाच्या जन्मानंतरही महिलांना या समस्येचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत हा एक मानसिक आजार बनतो, ज्याला वैद्यकीय भाषेत ‘पोस्टपार्टम डिप्रेशन’ असे म्हटले जाते. त्यामुळे गरोदरपणाच्या काळावधीत महिलांनी शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे.
ही आहेत कारणे
बाळाचे संगोपन, योग्य पोषण, आहार, बाळाचा शारीरीक विकास याबाबत गर्भवती महिलांना काळजी वाटते. संपूर्ण गर्भधारणेदरम्यान शरीरात अनेक शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल होतात. शरीरातील हार्मोनल असंतुलनामुळे मूड स्विंग्ज होऊ शकतात. नकारात्मक विचार आणि नैराश्य येणे विशिष्ट भावना यादरम्यान दिसून येतात.
सर्वच टप्प्यांमध्ये नैराश्याचा सामना
अशा अनेक स्त्रियांना गर्भधारणेपासून ते प्रसुतीपर्यंतच्या संपुर्ण प्रक्रियेची भीती वाटते. जास्त तणावाखाली वावरलात तर गर्भधारणेच्या सर्वच टप्प्यांमध्ये नैराश्याचा सामना करावा लागतो. काही गरोदर स्त्रिया त्यांच्या आई होण्याच्या क्षमतेबद्दल किंवा मूल वाढवण्याच्या त्यांच्या आर्थिक क्षमतेबद्दल घाबरतात. इतकंच नाही तर काहींना बायपोलर डिसऑर्डर, पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर , पॅनीक डिसऑर्डर, ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव डिसऑर्डर इत्यादींचा सामना करावा लागू शकतो. - डॉ. मधुलिका सिंग, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ
२०% महिलांवर परिणाम
मूड डिसऑर्डरचा गर्भधारणा आणि प्रसुतिपूर्व काळात २०% महिलांवर परिणाम होऊ शकतो. ज्या महिलांना नैराश्याचा कौटुंबिक इतिहास असतो, त्यांना हा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. बऱ्याचदा हॉर्मोन बदलामुळे गर्भवती महिलेचा मूड स्विंग होऊ शकतो. थकवा, तणाव, चिंता, आर्थिक चिंता, पाठिंब्याचा अभाव ही यामागील कारण आहेत. यात वारंवार होणारी चिंता, चिडचिड, एकाग्रतेसाठी झोपेचा त्रास, खराब स्मरणशक्ती ही सुरुवातीची लक्षणे दिसू शकतात. संबंधित लक्षण दिसून आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. - डॉ. नितीन गुप्ते, स्त्रीरोग तज्ज्ञ