धायरी : सिंहगड रस्ता परिसरातील विठ्ठलवाडी येथील विठ्ठल मंदिरात भाविकांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी केली होती. दिवसभरात दीड लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले असल्याचे ट्रस्टचे विश्वस्त कुमार गोसावी यांनी लोकमतला सांगितले.
मुठा नदीच्या किनारी विठ्ठलवाडी येथे साडेतीनशे वर्षांपासून विठ्ठल रखुमाईचे मंदिर आहे. पेशवाईकाळात हे विट्ठल मंदिर उभारले गेले असून प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडीत आषाढी यात्रेला दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक येतात मात्र गेले दोन वर्ष संसर्गजन्य विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण विश्वच त्रस्त झालेले होते. त्यामुळे गेल्या वर्षी आषाढी यात्रेत भाविकांना एकत्रपणे येण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. तसेच सरकारी आदेशनुसार गेले दोन वर्ष आषाढी यात्रा रद्द करण्यात आली होती. परंतु यावर्षी शासनाच्या आदेशाचे पालन करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. शनिवारी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर परिसरात विविध राजकीय पदाधिकाऱ्यांकडून दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी उपवासाचे फराळ व चहाचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर अग्निशमन दलाचे जवान वाहनासह तैनात होते. तर महापालिकेच्या वतीने मंदिर परिसरात स्वच्छ्ता करण्यासाठी कर्मचारीही नेमण्यात आले होते. सिंहगड अकॅडमी च्या वतीने ४२ विद्यार्थी विद्यार्थिनीनी मदत केली.
आषाढी एकादशीला सकाळी सहापासून रात्री ११ पर्यंत विठ्ठलवाडी येथे दोन पोलिस उपायुक्त, पाच पोलिस निरीक्षक, १० ते १२ पोलिस उपनिरीक्षक, यांच्यासह २५० पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाने देखील आषाढीच्या पार्श्वभूमीवर तयारी करताना भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही व मोबाईल टॉयलेट उपलब्ध करून दिले होते. तसेच वैद्यकीय पथक देखील भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते.
सिंहगड रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी...
हिंगणे खुर्द परिसरात दुपारनंतर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढल्याने सिंहगड रस्ता परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह शिंगाडे व पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली.