पिरंगुट : मुळशी तालुक्यातून जात असलेल्या पुणे-कोलाड महामार्गावरील भुकूम हद्दीतील हाॅटेल गारवासमोर भरधाव वेगात असलेल्या डंपर आणि दुचाकीचा अपघात झाला असून, या अपघातामध्ये पती-पत्नीचा जागेवरच मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि.१२) रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
अनिल काळू सूर्यवंशी आणि प्रिया अनिल सूर्यवंशी (रा.लवळे फाटा, पिरंगुट ता. मुळशी) अशी अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पती-पत्नीची नावे आहेत. अवघ्या आठ महिन्यांपूर्वीच या दोघांचा विवाह झाला होता. त्यामुळे त्यांचा संसार फुलण्यापूर्वी काळाने उभयंतावर झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे.या अपघातानंतर डंपर चालक फरार झाला असून, या प्रकरणी अभिजित दत्तात्रय तरवडे (रा. पिरंगुट, ता. मुळशी, मूळ रा. बारागांव नांदुर ता. राहुरी) यांनी पौड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.
प्रिया सूर्यवंशी बुधवारी (दि.११) त्यांच्या मैत्रिणीबरोबर गणपती पाहण्यासाठी पुण्यामध्ये गेल्या होत्या. तेव्हा गणपती पाहून परत रात्री उशिरा भूगाव येथे आल्या होत्या. त्यांना घरी घेण्यासाठी त्यांचे पती अनिल सूर्यवंशी हे लवळे फाटा येथून भूगावला गेले होते. तेथे गेल्यानंतर अनिल सूर्यवंशी यांनी आपली पत्नी प्रिया यांना घेऊन आपल्या दुचाकीवरून लवळे फाट्याकडे निघाले, तेव्हा मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या दिशेने निघालेल्या एका डंपरने (एमएच १४ एलजी ७९११) भुकूम गावाचा हद्दीमध्ये असलेल्या एका नामांकित हाॅटेलसमाेर या पती-पत्नीच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. तेव्हा या अपघातामध्ये अनिल आणि प्रिया या पती-पत्नीच्या डोक्याला गंभीर जखमी हाेऊन दाेघांचाही जागेवरच मृत्यू झाला. त्यांना हाॅस्पिटलमध्ये रुग्णालयात दाखल केले असताना डाॅक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घाेषित केले. शवविच्छेदनासाठी त्यांचे मृतदेह पाैड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले हाेते. या संपूर्ण घटनेचा तपास पौड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण हे करीत आहेत.