पुणे :इस्रायली तसेच अमेरिकन ज्यूंचे पुण्यातील प्रार्थनास्थळ अर्थात खब्बात (छाबाड) हाऊस येथील धर्मगुरू इस्रायलला स्थलांतरित झाल्याने आता बंद करण्यात आले आहे. कोरेगाव पार्कमधील ओशो आश्रमात येणाऱ्या ज्यू धर्मीयांसाठी सन १९९२ मध्ये हे प्रार्थनास्थळ सुरू केले होते. धर्मगुरूंनीच स्थलांतर केल्याने आता हे प्रार्थनास्थळ उघडेल की नाही, याबाबत साशंकता आहे. हे प्रार्थनास्थळ गेली अनेक वर्षांपासून दहशतवाद्यांच्या टार्गेटवर हाेते. त्यामुळे येथे पाेलिसांचा चाेवीस तास बंदाेबस्त असायचा.
पुण्यात अनेक वर्षांपासून बेने इस्रायली अर्थात भारतीय ज्यूंचे वास्तव्य आहे. कोकणातून स्थलांतरित झालेल्या या बेने इस्रायली ज्यूंसमवेत जगातील अन्य देशांमधील ज्यूदेखील पुण्यात राहत आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक ज्यूधर्मीय कोरेगाव पार्कमधील ओशो आश्रमात येत असतात. त्यात प्रामुख्याने इस्रायल व अमेरिका या देशांमधील ज्यूंचा समावेश आहे. बेने इस्रायली या ज्यूंना कट्टर ज्यू म्हणून संबोधतात. त्यामुळेच पुण्यातही आपल्यासाठी स्वतंत्र प्रार्थनास्थळ असावे असे या ज्यूंना वाटले. त्यानुसार १९९२ मध्ये ओशो आश्रमाशेजारीच या प्रार्थनास्थळाची अर्थात खब्बात हाऊसची निर्मिती केली हाेती. मुंबईतही अशा प्रकारची दोन खब्बात हाऊस आहेत.
या कट्टर ज्यूंच्या धार्मिक चालीरीती बेने इस्रायलींपेक्षा काहीशा वेगळ्या आहेत. त्यामुळेच पुण्यातील बेने इस्रायली या खब्बात हाऊसमध्ये जात नसत. हे खब्बात हाऊस सुरू होण्यापूर्वी व सुरू झाल्यानंतर काही वर्षे हे ज्यू बेने इस्रायलींच्या प्रार्थनास्थळात येत असत.
पाेलिस संरक्षणही काढले
गेल्या आठवड्यात कोथरूडमधून इसिसच्या दोन दहशतवाद्यांना एटीएसने अटक केली होती. पोलिसांच्या तपासात त्यांच्याकडून पुण्यातील खब्बात हाऊसचीदेखील रेकी झाल्याचे निष्पन्न झाले होते. दहशतवाद्यांच्या कायमच हिटलिस्टवर असल्याने त्याला पोलिस संरक्षण देण्यात आले होते. मात्र, धर्मगुरू स्थलांतरित झाल्यानंतर हे पोलिस संरक्षण काढून घेण्यात आले आहे.
सुरुवातीच्या दोन वर्षांमध्ये एक धर्मगुरू इस्रायलहून येथे राहण्यास आले होते. त्यानंतर शाझलिक नावाचे रब्बाई अर्थात धर्मगुरू वास्तव्यास आले. साधारण ३० वर्षे त्यांनी या खब्बात हाऊसमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शाझलिक सहा महिन्यांपूर्वीच इस्रायलमध्ये स्थलांतरित झाले आहेत. त्यांना एक मुलगी व नऊ मुलगे होते. त्यांचा सर्वांत धाकटा मुलगा रब्बाई होण्याच्या प्रशिक्षणासाठी इस्रायलला स्थलांतरित झाला. त्यामुळे त्यांनी इस्रायलला स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला.
- योसेफ नौगावकर, बेने इस्रायलींचे पुण्यातील धर्मगुरू.