यवत (पुणे) : येथे पुणे-सोलापूर महामार्गावर नर जातीच्या बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १७) रात्री साडेदहाच्या दरम्यान यवत येथील नाईक बागेसमोर घडली.
मागील काही महिन्यांपूर्वी लडकतवाडी येथे शेतीच्या बांधावर लावलेल्या जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, आता यवत येथे वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मागील दोन महिन्यांपासून यवत येथील नाईक बाग परिसरात बिबट्याचा वावर होता. या परिसरातील काही मजुरांनी बिबट्याला पाहिल्याने ते काम सोडून निघून गेले होते. त्यामुळे या भागात वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केलेली होती.
घटनेची माहिती मिळताच, वनरक्षक सचिन पुरी घटनास्थळी हजर झाले. त्यांनी तत्काळ बिबट्याचे मृत शरीर महामार्गावरून बाजूला घेतले, तसेच सर्व कायदेशीर प्रक्रिया व शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृत बिबट्याचे अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती दिली. बिबट्याचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळताच, घटनास्थळी बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.