- भानुदास पऱ्हाड
आळंदी (पुणे) : खेड तालुक्यात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अगदी दिवसा - ढवळ्या नागरिकांना बिबट्या नजरेस पडत आहे. विशेषतः मानवी वस्तीत बिबट्याचा शिरकाव वाढल्याचे चित्र आहे. मागील आठवड्यात वडगाव - घेनंद परिसरातील नागरिकांना बिबट्या दिसत होता. मात्र सद्यस्थितीत गजबजलेल्या तीर्थक्षेत्र आळंदीच्या वेशीवर बिबट्या येऊन ठेपला असून विश्रांतवड परिसरात एका कुत्र्याची शिकारी बिबट्याने केली आहे.
खेड तालुक्यातील वडगाव - घेनंद, मोहितेवाडी, कोयाळी - भानोबाची, साबळेवाडी, मरकळ, बंगलावस्ती, दौंडकरवाडी, रामनगर, चिंचोशी, सिद्धेगव्हाण, चऱ्होली खुर्द आदी ठिकाणी नागरिकांना बिबट्याचे सातत्याने दर्शन होत आहे. साबळेवाडीलगत असलेल्या वाजेवाडी परिसरात बिबट्याचा कायमस्वरूपी मुक्काम असून नुकतीच बिबट्याची पिल्लेही आढळून आली आहेत. तर सोमवारी (दि.७) रात्री सातकरस्थळ हद्दीत ऍड. गिरीष कोबल यांच्या घरी बिबट्या थांबल्याचे आढळून आले. तसेच पऱ्हाडवाडी येथे सोमवारी मध्यरात्री बिबट्याने कुत्र्यावर हल्ला चढवला. बिबट्या व कुत्र्यामध्ये झालेली झटापट येथील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
एकंदरीतच सर्व भागात बिबट्याचा वावर वाढत असल्याची सत्यस्थिती आहे. मागील अनेक महिन्यांपासून खेडच्या पूर्व भागातील अनेक गावांमधील बागायती पट्ट्यात बिबट्याचा वावर असल्याचे अनेक घटनांमधून उघड झाले आहे. आळंदी व वडगाव - घेनंद परिसरात वारंवार दिसणाऱ्या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरत आहे. दोन आठवड्यांपूर्वी वडगाव - घेनंद परिसरात बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ला केला आहे. तर परिसरातील पाळीव कुत्री वारंवार बिबट्याची शिकार होत आहेत. परिणामी बिबट्याच्या दहशतीने स्थानिकांमध्ये भीती भरली असून वनविभागाने उपाययोजना कार्यान्वित करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. वनविभागाकडून पाहणी व जनजागृती...
सध्या खरीप हंगामातील शेतकामे सुरू आहेत. मात्र बिबट्याच्या व मादीच्या वास्तव्याने नागरिकांमध्ये भीती पसरली असून शेतकामात अडथळे येत आहेत. यापार्श्वभूमीवर वनविभाग अधिकाऱ्यांनी आळंदीत येऊन सीसीटीव्ही फुटेजची व परिसराची पाहणी केली. तसेच स्थानिक नागरिकांमध्ये जनजागृती केली.
आळंदीच्या वेशीवर बिबट्या वावरत असल्याने भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने दोन ठिकाणी पिंजरे लावले आहेत. बिबट्याला जेरबंद करणे गरजेचे आहे. कारण यापूर्वी काही ठिकाणी पाळीव प्राण्यांवर हल्ले झाले आहेत. मनुष्यहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वनविभागास आमचे सहकार्य राहील.- अनिकेत कुऱ्हाडे, ग्रामपंचायत सदस्य चऱ्होली.