चाकण : चाकण शहरातील बाजारपेठ भागातील जामा मस्जिद परिसरातील एका पडक्या घरात बुधवार (दि.१५ ) सकाळी सातच्या सुमारास बिबट्या शिरला होता. चाकण वनविभाग व माणिक डोह बिबट निवारा केंद्र येथील रेस्क्यू टिमने अत्यंत शिताफीने बिबट्याला पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर वनविभागाला जेरबंद यश मिळाले.
चाकण शहरातील गजबजलेल्या बाजारपेठ भागातील जामा मस्जिद शेजारील पडक्या घरातून मांजर गुरगुरण्याचा आवाज ऐकू येत असल्याने चाकणचे माजी उपसरपंच कालिदास वाडेकर यांनी आपल्या घरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता,त्यामध्ये एक बलदंड बिबट्या घरासमोरून पळून जात असताना दिसून आला. त्यांनी ही माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर वनपरिक्षेत्र कार्यालय चाकण अंतर्गत बचावपथक व माणिक डोह बिबट निवारा केंद्र येथील रेस्क्यू टिम आणि चाकण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जुन्नर विभागाचे उप वनसंरक्षक अमोल सातपुते, सहायक वनसंरक्षक संदेश पाटील, चाकण वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीमने अत्यंत शिताफीने पडक्या घरातील झाडेझुडपांमध्ये लपून बसलेल्या बिबट्याला पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर साडे अकरा वाजण्याच्या सुमारास महेंद्र ढोरे आणि डॉ चंदर यांनी आपल्या जवळील बंदुकीतून बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन फायर करून बेशुद्ध केले. त्यानंतर त्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. सदर नर बिबट्या साधारणत: एक ते दोन वर्षे वयाचा शारिरीक दृष्टया सक्षम असल्याचे तपासणीतून स्पष्ट झाले.