पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पुणेकरांना उष्णतेमुळे प्रचंड उकाडा सहन करावा लागला. गुरूवारी (दि.१८) उच्चांकी ४३ तापमानाची नोंद झाली. पण आज मात्र तापमानाचा पारा जरासा खाली आला असून, त्यामुळे उकाडा कमी जाणवत आहे. तरी देखील दुपारी घराबाहेर पडू नये, असे आवाहन हवामानशास्त्रज्ञांनी केले आहे. तसेच आज उष्णतेची लाट जाणवणार नाही आणि सायंकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. असाही अंदाज दिला आहे.
शहरात गुरूवारी (दि.१८) शिवाजीनगरला ४१ आणि वडगावशेरी, मगरपट्टा, हडपसर या ठिकाणी ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उकाड्याने पुणेकरांच्या अंगाची लाही लाही झाली. आज (दि.१९) पुणेकरांना जरासा दिलासा मिळाला असून, तापमान ४० अंशावर आले आहे. आजपासून कमाल तापमानात घट होऊन उकाडा कमी जाणवेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिला आहे. आज किमान तापमान हडपसरला २८, मगरपट्टा २७.६, वडगावशेरीला २७.५ आणि कोरेगाव पार्कला २७.१ नोंदले गेले आहे. तर शिवाजीनगरला २४.७ अंशावर तापमान नोंदले गेले.