जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या श्री खंडोबा देवाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री मार्तंड देवस्थान ट्रस्टवर बाहेरील विश्वस्त नेमल्याने जेजुरी ग्रामस्थांच्या वतीने धरणे आंदोलनात खोमणे प्रतिष्ठान व ग्रामस्थ सहभागी झाले. धरणे आंदोलनाला माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी भेट दिली. भाविकांच्या सेवेसाठी स्थानिक विश्वस्त मंडळ नियुक्त करणे आवश्यक होते. आपला या आंदोलनाला पाठिंबा असून, हा प्रश्न आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मांडणार असल्याचे शिवतारे यांनी सांगितले.
आज जेजुरी येथील खोमणे प्रतिष्ठानच्या वतीने या आंदोलनात सहभाग घेण्यात आला. या आंदोलनात मेंढ्या आणून पारंपरिक सुंबरान मांडण्यात येऊन बाहेरील विश्वस्त मंडळ रद्द व्हावे, यासाठी देवाला साकडे घालण्यात आले.
शिवतारे यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला. ते म्हणाले, अनेक शतकांपासून जेजुरीच्या श्री खंडोबा देवाची सेवा तसेच देवाची महती, रूढी-परंपरा, यात्रा-जत्रा, उत्सव या जेजुरीकरांनी जपल्या आहेत. या परंपरा पुढील काळात जतन करण्यासाठी जेजुरीतीलच स्थानिक विश्वस्तच नेमायला हवेत. मात्र, पुणे धर्मादाय उपायुक्तांनी विश्वस्त निवडीबाबत घेतलेल्या निर्णयामुळे माझ्यासहित जेजुरीकरांचा प्रचंड रोष आहे. स्थानिक आंदोलकांना पक्षविरहित कार्यकर्त्याच्या समवेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर लवकरच बैठक लावून चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप यादव, सेनेचे अविनाश बडदे, दादा थोपटे, धीरज जगताप, हरिभाऊ लोळे तसेच शिवसेना जेजुरी शहराध्यक्ष विठ्ठल सोनवणे, मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.