Maharashtra Assembly Election 2024 : बारामतीत काका-पुतण्याच्या लढतीकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 09:14 AM2024-11-20T09:14:57+5:302024-11-20T09:20:19+5:30
प्रशासकीय यंत्रणा सज्ज : पावणेचार लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क
बारामती :बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्या होणाऱ्या लढतीकडे केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर पूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंंबीय बुधवारी (दि. २०) बारामती, काटेवाडीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दरम्यान, बारामती विधानसभेसाठी सुमारे पावणेचार लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
बारामती विधानसभा मतदारसंघात बुधवारी, दि. २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी आज पोलिस बंदोबस्तात मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले असून सर्व साहित्य सुस्थितीत मतदान केंद्रावर पोहोचले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.
अधिक माहिती देताना नावडकर म्हणाले, बारामती विधानसभा मतदारसंघात एकूण मतदारसंख्या ३ लाख ७५ हजार ७१२ आहे. त्यापैकी १ लाख ९० हजार ८४१ पुरुष मतदार, १ लाख ८४ हजार २९० महिला मतदार, २१ इतर मतदार आहेत. बारामती मतदारसंघांमध्ये एकूण ३८६ मतदान केंद्र आहेत. त्यासाठी ३९ टेबलची व्यवस्था करून ३२६ बॅलेट युनिट, ४६३ कंट्रोल युनिट, ५०१ व्हीव्हीपॅट यंत्राचे औद्योगिक वसाहतीमधील वखार महामंडळाच्या गोडाऊन येथून केंद्रनिहाय मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले. मतदारसंघात ३८६ मतदान केंद्रांवर एकूण १ हजार ९४३ मतदान कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर अधिकारी आणि कर्मचारी यांना नेण्यासाठी एकूण ४७ एस.टी. बसेस, १५ खासगी मिनी बसेस, ९ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. बारामती करिता ४० क्षेत्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी ३९ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानापर्यंत बारामती व इंदापूर तालुक्यात १४३४ पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहेत. बारामती, इंदापूर तालुक्यातील एकूण बंदोबस्त पोलिस अंमलदार- ७८०, होमगार्डस् ५६९, सीमा सुरक्षा बल ८५ आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. सुदर्शन राठोड यांनी दिली.
१९३ मतदान केंद्र
बारामती मतदारसंघांमध्ये १९३ मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग करण्यात येणार आहे. मतदानप्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून यामध्ये ३० पेक्षा जास्त पोलिस अधिकारी, ३८६ पोलिस कर्मचारी, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स १ प्लाटून, आरपीएफ हरयाणाचे २ प्लाटून मिळून ७० जवान नियुक्त करण्यात आले आहेत. मतदारांच्या स्वागतासाठी विशेष मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. यामध्ये मॉडेल मतदान केंद्र जिल्हा परिषद शाळा दत्तवाडी, गुणवडी, पिंक मतदान केंद्र जळोची येथील सामाजिक न्याय विभाग मुलींचे शासकीय वसतिगृह, माळेगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत दिव्यांग मतदान केंद्र, युवक मतदान केंद्र महाराष्ट्र एज्युकेशन हायस्कूल बा.न.प. बारामती, विशेष मतदान केंद्र जिल्हा परिषद शाळा डोर्लेवाडी येथे स्थापन केले आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात २३ उमेदवार आहेत. यामध्ये १५ अपक्षांचा समावेश आहे.